अवघ्या 4 तासांत एपीआय अनिल व्हटकर यांनी खुन्याच्या आवळल्या मुसक्या
अतिरिक्त तथा प्रभारी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचे मौलिक मार्गदर्शन
सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : कसाल बाजारपेठेतील मोबाईल व्यावसायिक सचिन भोसले याच्या खुनाचा छडा सिंधुदुर्ग पोलिसांनी लावला असून तपासी अधिकारी एपीआय अनिल व्हटकर यांनी अवघ्या 4 तासांत खुन्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. सचिन भोसले चा खून त्याचा सख्ख्या थोरला भाऊ वामन उर्फ संतोष श्रीकांत भोसले ( वय 43 ) याने केला असल्याचे एपीआय अनिल व्हटकर यांनी तपासात उघड केले आहे. घटनास्थळी कोणताही वस्तुनिष्ठ पुरावा नसतानाही प्रभारी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मौलिक मार्गदर्शनाखाली एपीआय अनिल व्हटकर यांनी कौशल्य पणाला लावून खुनाचा छडा लावण्यात यश मिळवण्याची कौतुकास्पद कामगिरी केली आहे. आरोपी वामन उर्फ संतोष याने मृत सचिन झोपेत असताना त्याच्या मानेत पाठीमागून लोखंडी शिग खुपसली आणि या हल्ल्यात सचिन च्या मेंदूची कवटी फुटून तो जागीच गतप्राण झाला. मोबाईल व्यावसायिक सचिन भोसले चा मृतदेह त्याच्या कसाल बालमवाडी येथील राहत्या खोलीत आढळला होता.त्याच्या नाक आणि कानातून रक्तस्त्राव झालेला आढळून आला होता. या प्रकरणात नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. त्यानुसार अतिरिक्त तथा प्रभारी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्वतः या गुन्ह्यात लक्ष घालत तपासाची सूत्रे एपीआय व्हटकर यांच्याकडे सोपवली.एपीआय व्हटकर यांनी अवघ्या 4 तासांत खुनासारख्या गंभीर गुन्ह्याचा यशस्वी तपास करत आरोपीलाही अटक केली आहे. दरम्यान आरोपी वामन उर्फ संतोष याने खुनाची कबुली दिल्याचे समजत आहे.भोसले यांच्या कुटुंबात वयाने लहान असला तरी सचिन हा कौटुंबिक जबाबादरीचे भान असलेला होता. तर वामन उर्फ संतोष हा अय्याश वृत्तीचा आणि दारूचे व्यसन असणारा. त्यामुळे साहजिकच कुटुंबातील व्यक्तींकडून लहान भाऊ असलेल्या सचिन ला मिळणारी मानाची वागणूक आरोपी वामन याला खटकत होती.त्यातूनच आरोपी वामन याचे कुटुंबात खटके उडत होते. या रागातूनच आरोपी वामन याने आपला skkha लहान भाऊ सचिन याचा जीव घेतल्याचे पोलीस तपासात पुढे येत आहे.