सामान्य रुग्णांना दरवाढ परवडणारी नसल्याने दर जुन्या धोरणाप्रमाणेच ठेवण्याची मागणी
वैभववाडी (प्रतिनिधी) : रक्तदर वाढीसंदर्भात आज सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या वतीने तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. ही दरवाढ सामान्य रुग्णांना परवडणारी नसल्याने रक्त दर जुन्या धोरणाप्रमाणेच ठेवण्याची यावेळी मागणी करण्यात आली. यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान अध्यक्ष राजेश पडवळ, उपाध्यक्ष संजय रावराणे, सचिव मंदार चोरगे, खजिनदार मंगेश चव्हाण, किशोर दळवी, प्रशांत ढवण, सचिन काळे, प्रशांत कदम, शेखर रावराणे, संजय गुरखे, शांतेश सुतार आदी पदाधिकारी व रक्तदाते उपस्थित होते.
राष्ट्रीय रक्तधोरण व्यवस्थापन रक्त व रक्तघटक पुरवठा यासाठी आकारण्यात आलेल्या सुधारीत सेवाशुल्क वाढीबाबत ८ फेब्रुवारी, २०२३ रोजीचा शासन निर्णय व दिनांक ११/१२/२०२० रोजीचा शासन निर्णय लक्षात घेता खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी रुपये ४५०/- वरुन रुपये ११०० इतकी दरवाढ केली आहे. अनेकवेळा काही सेवा या शासकीय रुग्णालयात उपलब्ध होत नाहीत, अशावेळी खाजगी रुग्णालयातच नाईलाजाने रुग्णांवर उपचार केले जातात. अशावेळी जर रक्ताची गरज लागली तर या सुधारीत दराने सामान्य व गरिब रुग्णास रक्त घ्यावे लागेल परंतु निश्चितच खाजगी रुग्णालयात जाणाऱ्या सामान्य व गरिब रुग्णांना ही दरवाढ परवडणारी नाहीय, त्यामुळे ही नवीन दरवाढ रद्द करुन जुन्या धोरणा प्रमाणेच ती ४५०/- रुपये अशी ठेवावी. खेड्यापाड्यातील सामान्य व गरिब जनता नाईलाजाने किंवा अपरिहार्यपणे खाजगीत उपचार घेत आहेत, रक्ताचे शुल्क वाढवल्यामुळे हा अधिकचा भुर्दंड या जनतेस पडणार आहे. त्यामुळे या बाबीकडे अत्यंत संवेदनशीलतेने शासनाचा लक्षवेध करावा, तसेच सुधारीत वाढीव सेवाशुल्काबाबत स्थगिती देऊन ती खाजगी करिता पूर्ववत ठेवण्याबाबत पुनर्विचार करावा. या आशयाचे निवेदन सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या वतीने वैभववाडी तहसीलदार प्रसन्नजीत चव्हाण तसेच गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांना देण्यात आले.