म्हापसा येथील शिमगोत्सवात जीवन आनंद संस्थेच्या चित्ररथाचा सहभाग

खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय संस्कृती आणि परंपरेत शिमग्याच्या सण उत्सवाला खूप मोठे स्थान आहे. देशातल्या विविध प्रांतातील लोक फाल्गुन महिन्यात शिमग्याचा सण आनंद आणि उत्साहाने साजरा करतात आणि सृष्टीतील नवचैतन्याने बहरलेल्या वसंत ऋतूच्या आगमनाचा आनंद मनमुराद घेत असतात.

अशाच प्रकारे गोव्यातील म्हापसा येथे म्हापसा शिमगोत्सव मंडळाच्या माध्यमातून या निमित्ताने विविध विषयांवरील चित्ररथ स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाही चित्ररथ स्पर्धेचे उत्स्फुर्तपणे आयोजन करण्यात आले होते.

गोव्यातील म्हापसा शहरात रस्त्यावरील निराधार वंचितांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणा-या जीवन आनंद संस्थेने यावेळी प्रथमच आपल्या चित्ररथाद्वारे स्पर्धेत सहभाग घेतला होता.या आगळ्यावेगळ्या चित्ररथाला यावेळी आयोजकांकडून  रू.७०००/- चे उत्तेजनार्थ पारितोषिक देवून गौरविण्यात आले.
   
म्हापसा येथील डॉ. पाटकर सर व प्रशांत बर्वे सर ह्यांच्या  संकल्पनेतून नारळाच्या झावळ्यांनी सजवलेल्या झोपडीच्या चित्ररथाद्वारे जीवन आनंद संस्थेच्या कार्याचा प्रचार व प्रसार यावेळी लोकांमधे करण्यात आला. म्हापशातील नागरिकांनी चित्ररथ संकल्पनेला चांगला प्रतिसाद दिला. चित्ररथ निर्मितीसाठी प्रसाद आंगणे, साईदास कांबळे, प्रांजल आंगणे , माॅ आसोराघर फोंडा चे श्रेयस मेस्त्री, संवीता आश्रम चे आशिष कांबळी, विजया कांबळी, नरेश आंगणे, सचिन पडते, आरती वायंगणकर,  सौ. लोट ताई, सौ. गुरव ताई, तसेच स्वयंसेवक राज परब, परेश परब व टायगर वाँर्डमधील बालकांची मोठी मदत झाली. या उपक्रमाच्या आयोजनातील सर्वांसह सर्व सहभागी मुले , मदत करणा-या भगिणी ह्या सर्वांमुळे काल कमीत कमी दहा बारा हजार माणसांपर्यंत जीवन आनंद संस्थेचे कार्य पोहोचले गेल्याबद्दल संस्थेचे संस्थापक संदिप परब यांनी सर्वांचे अभिनंदन करून समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!