कळंबा मध्यवर्ती कारागृहातील बंदी निर्मित वस्तुंच्या प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : विविध सणांचे औचित्य साधून बंदी निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्यांचे आयोजन कळंबा कारागृहात करण्यात येते. सामान्य नागरिकांना कारागृह निर्मित उच्च दर्जाच्या विविध वस्तु माफक दरात उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने घेण्यात येणाऱ्या अशा प्रदर्शनाचा नागरीकांनी लाभ घ्यायला हवा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

कारागृह उद्योग अंतर्गत बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातून दिवाळी सणानिमित्त कारागृह निर्मित वस्तुंचे प्रदर्शन व विक्री सोहळा घेण्यात आला. या सोहळ्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

“सुधारणा व पुनर्वसन” हे कारागृहाचे ब्रीद असून कारागृहातील बंदी हा समाजाचा एक घटक असतो, त्यांच्यामध्ये विविध प्रकारचे उपजत कलागुण असतात व त्यांच्या या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने बंद्यांना कारागृहात विविध प्रकारचे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येते. तसेच बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र कारागृह उद्योग विक्री केंद्राची स्थापना करण्यात आली असून या विक्री केंद्रामार्फत बंदीनिर्मित वस्तूंची विक्री करण्यात येते. विविध सणांचे औचित्य साधून बंदी निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. दिवाळी सणानिमित्त यावर्षी बंद्यांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या कलाकुसरीच्या आकर्षक वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन 28 ऑक्टोबर रोजी करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान बंद्यांनी सागवान लाकडापासून तयार केलेले विविध प्रकारचे फर्निचर, देवघर, शोभेच्या वस्तु, आकाशकंदील, कपडे, हातरुमाल, टॉवेल, बेडशीट, चादरी, बेकरी पदार्थ, शेव, बिस्कीट व कोल्हापुर नगरीचे आराध्यदैवत अंबाबाईचा प्रसादाचा लाडू तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनास सामान्य नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य, पुणे-१ यांच्या संकल्पनेतून व विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य पुणे-१ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, येरवडा, पुणे-६ यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक एन.जी. सावंत, अतिरिक्त अधीक्षक विवेक झेंडे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी चंद्रशेखर देवकर तसेच इतर सर्व कारागृह अधिकारी, कर्मचारी व लिपिक- तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!