एक मत तुमच्या लाडक्या लेकीला…हक्काच्या अर्चना घारे परब यांना – ऍड नकुल पार्सेकर

सावंतवाडी (प्रतिनिधी) : लेक जन्माला येतानाच चैतन्य घेऊन येते. घरात मायेचा झरा तुडुंब भरून वाहू लागतो.. आई, वडील, भावंड याही पलीकडे घरातल्या प्रत्येकाला लळा लावते. मग तोही एक दिवस येतो. मायेची माणसं मागे सोडून ती दूर गावी सासरी जाते.. पण तिचा जीव आयुष्यभर माहेरच्या सुखदुःखात अडकलेला असतो. माहेरच प्रत्येक दुःख हलक व्हाव यासाठी तिचा जीव तळमळतो.. पण माहेर खूप मागे सुटलेलं असतं. यातल्या फार कमी जणीच माहेरच दुःख, प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्यक्ष हातभार लावतात. यातही अगदी मोजक्या जणी माहेर म्हणजे केवळ एक घर नव्हे तर ते घर, कुटुंब ज्या समाजामुळे, प्रांतामुळे घडलं त्या सगळ्याला माहेर मानून तेथील प्रश्न , तिथंल्या लोकांचे अश्रू पुसण्यासाठी आपला मायेचा पदर हळूवार पुढे करतात.. पण त्यातही आपलं समृद्ध, सुखमय जीवन सोडून आपल्या माहेरच्या समृद्धीसाठी आयुष्याचा दीर्घकाळ पणाला लावणाऱ्या अर्चनाताईंसारख्या लेकी दुर्मिळच म्हणाव्या लागतील. लाल मातीत मिसळलेले अश्रू दूर करून येथे समृद्धी आणण्यासाठी झटणाऱ्या या लेकीला साथ दिली नाही तर आपल्यासारखे दुर्दैवी कोणीच नाही. खूप वर्षानी अशी संधी आपल्याला मिळाली आहे.

अस मी का म्हणतोय याच उत्तर अर्चनाताई अर्थात अर्चना घारे परब यांच्या जीवन प्रवासात लपले आहे. ताईच कुटुंब मूळ सावंतवाडी तालुक्यातील भालावलच. हे निसर्गसंपन्न जैवविविधतेने समृद्ध सह्याद्रीतील सुंदर गाव.. इथल्या परब कुटुंबातील अर्चनाताईंचा अर्थात अर्चना यशवंत परब यांचा जन्म.. शाळकरी शिक्षणाचे धडे सावंतवाडीच्या मिलाग्रीस हायस्कूलमधे गिरवून बारावी सायन्स पर्यंत शिक्षण त्यांनी आरपीडीतून पूर्ण केले. पहिल्यापासूनच त्या स्कॉलर.. पुढे रत्नागिरीत शासकीय तंत्रनिकेतनमधुन डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरींग पूर्ण केल. तेही मेरिटच्या जोरावर.. याच मेरिटमुळे त्यांना पुण्याच्या सीओईपी कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनियरिंगसाठी प्रवेश मिळाला.. सीओईपीमधे प्रवेश म्हणजे ‘लाइफ सेट’ मानले जाते. महाराष्ट्रात मुंबईच्या व्हिजेटीआय नंतर नंबर दोनचे इंजीनियरिंग कॉलेज म्हणून ‘सीओईपी’ची ओळख आहे. इथून पास आऊट म्हणजे किमान दहा लाखाचे पॅकेज असणारी नोकरी मिळतेच. साधारण वीस-बावीस वर्षांपूर्वी अर्चनाताईंनी येथून इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. कल्पना करा त्या मेरीटच्या जोरावर कार्पोरेट क्षेत्रात गेल्या असत्या तर आज करोडो रुपये कमवले असते.. पण त्यांनी तसं केलं नाही.. लग्नानंतर त्यांची आयुष्याची दिशा समाजसेवेकडे वळली.

त्यांचे पती संदीप घारे हे पुणे मावळ प्रांतातील एक सेवाभावी आणि शरद पवारांशी एकनिष्ठ नाव… तेही उच्चशिक्षित आहेत. लग्नानंतर अर्चनाताई राजकारणात, समाजकारणात, सहकारात सक्रिय होऊ लागल्या. त्यांच्यातील क्षमता, समाजासाठी झोकून काम करण्याची तयारी पाहून पती संदीप घारे यांनीही त्यांना पाठबळ दिले. यातूनच त्या शरद पवार ,सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात आल्या. सुप्रिया ताईंच्या त्या सावली बनल्या. शरद पवार यांनी तर त्यांना लेकीसारखा जीव लावला. त्या एक एक पायरी चढू लागल्या.सरपंच ग्रामपंचायत, बेबडेओहळ, मावळ ,सदस्य, लोकनियुक्त महिला प्रतिनिधी संघ, महाराष्ट्र , अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी युवती काँग्रेस , उपाध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, संचालक इंद्रायणी महाविद्यालय, तळेगाव दाभाडे, संस्थापक, तनिष्का नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अशा यशाच्या आणि कर्तृत्वाच्या पायऱ्या चढत असतानाच त्यांना आपल्या माहेरची लाल माती खुणावू लागली.. त्या काम करत असलेल्या पुणे व परिसरात झालेला विकास आणि आपल्या माहेरी म्हणजे सावंतवाडी आणि परिसरातील तालुक्यात असलेली स्थिती याची तुलना त्या मनातल्या मनात करू लागल्या. यातूनच माहेरच्या प्रांतात समृद्धीचे विकासाचे पर्व आणण्याचे स्वप्न त्यांना खुणावू लागले. यासाठीच सह्याद्रीची ही लेक पुण्यातले सुखमय जीवन, येथील राजकीय क्षेत्रात असलेले करियर सोडून.. मुलबाळ लहान असतानाही आठ वर्षांपूर्वी आपले कार्यक्षेत्र म्हणून आपल्या माहेरला निवडून परत आली. या आठ वर्षात त्यांनी जोडलेली माणसे, दिलेला वेळ, यासाठी अनेक गोष्टींचा केलेला त्याग, दर्या खोऱ्यातील तुडवलेल्या वाटा, आपल्या परीने पदरमोड करत कोणतेही पद नसतानाही शेकडो जणांचे पुसलेले अश्रू हा इतिहास तर तुम्ही साक्षिदार आहात. अर्चना फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात एक प्रभावी सामाजिक चळवळ उभी केली.

आता प्रश्न राहतो की त्यांना आमदारच का बनायचंय.. एखाद्या भागाचा विकास करायचा तर तेथील प्रश्न सोडवणे हेच उत्तर नसते. तेथे प्रश्नच निर्माण होणार नाहीत असे धोरण ठरविणे व त्याची लोकसहभागातून प्रभावी अंमलबजावणी करणे हा उपाय असतो. यासाठी विधानसभा हे सगळ्यात प्रभावी माध्यम आहे. अर्चनाताईंना केवळ आमदार बनायचे असते तर पवार कुटुंबाशी असलेल्या कौटुंबिक नात्यामुळे त्या पुण्यातून कुठूनही यासाठी प्रयत्न करू शकल्या असत्या. त्यांनी मात्र स्वच्छ मनाने आपले माहेर निवडले. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटले की माहेरचे अश्रू पुसायला येणाऱ्या अर्चनाताईंसारख्या लेकी दुर्मिळच…

दुर्दैवाने अलीकडच्या निवडणुका म्हणजे बाजार बनल्याचे चित्र आहे. ज्याच्याकडे जास्त पैसा त्याची यात सरशी असे विचित्र समीकरण जुळू लागले आहे. पैसे ओतून आमदार होणाऱ्या आणि त्यातून आणखी पैसे कमावणाऱ्या व्यावसायिक राजकारण्यांच्या गर्दीत अर्चनाताईंसारखा आपले माहेरच्या प्रांताच्या समृद्धीसाठी आयुष्य पणाला लावून झटणारा चेहरा उठून दिसतो.. आता तुम्ही म्हणाल अर्चनाताईंची तरी कशी गॅरंटी द्यावी. उद्या खोक्यांसाठी पद विकायची वेळ आली तर.. पण त्या परीक्षेतही त्या मेरिटमध्ये उत्तीर्ण झाल्या आहे.. जेव्हा राष्ट्रवादी फूटली तेव्हा सत्तेत गेलेल्या अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा पर्याय त्यांच्यासमोर होता. कदाचित त्यांना यातून सत्तेची फळे चाखता आली असती ; पण पक्ष फुटला त्याच दिवशी आपण शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे त्यांनी जाहीर केले. इथेच त्यांचा प्रामाणिकपणा, निष्ठा सिद्ध होते. आमदार झाल्या तर त्या किती विकास करतील यापेक्षाही जे प्रयत्न करतील ते प्रामाणिक आणि लोकांशी असलेल्या निष्ठा राखून याची गॅरंटी मात्र या प्रवासातून नक्की मिळते.

गेली काही वर्षे या राजकीय दलदलीपासून मी दुर आहे पण एक सजग नागरिक म्हणून डोळे उघडे ठेवून पाहतो तेव्हा राजकारणाच्या या गर्दीत ताईंचा, सह्याद्रीच्या या लेकीचा चेहरा मात्र नक्कीच आश्वासक वाटतो.दुर्दैवाने विधानसभेच्या राजकारणात दोन वेळा क्षमता असूनही अर्चनाताईंना उमेदवारी बाबत डावलण्यात आले. तरी त्या जिद्दीने उभ्या आहेत.केवळ लक्ष्मीची उपासना करून ती दीर्घकाळ टिकत नाही. सरस्वतीची उपासना केली तर लक्ष्मी आणि समृद्धी आपोआप येते आणि ती टिकून राहते. सह्याद्रीची हि लेक सरस्वतीचे रूप घेऊन आपल्या माहेरच्या समृद्धीसाठी तुमच्या, आमच्यासाठी झगडते आहे. या निवडणुकीत लक्ष्मी उपासकांची गर्दी मोठी आहे. प्रत्येक मताची हजारात बोली लावण्या इतका त्यांचा खजिना भरलेला आहे. त्यांच्यासाठी मतांसाठी दिलेला हा पैसा म्हणजे गुंतवणूक आहे. एकदा आमदार झाल्यावर खजिना दुप्पट तिप्पट करण्याचा त्यांचा बिझनेस आहे. या लक्ष्मी उपसकांच्या सोनेरी गर्दीत अर्चनाताईसारखी सरस्वतीची आश्वासक तेजस्वी लेक तुम्हाला सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले या विधानसभा मतदार संघाच्या समृद्धीचे, तुमच्या पुढील पिढीच्या उज्वल भवितव्याचे स्वप्न दाखवत उभी आहे.. खर तर हि एक संधी आहे.. दीर्घकाळानंतर अशी कोणी तरी उच्च शिक्षित, प्रामाणिक, तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील लेक तुम्हाला विकासाची, तुमचे अश्रु पुसून आनंद पेरण्याची हाक देत आहे.. संधी एकदाच दार ठोठावते.. तुमचं एक मत तिला बळ द्यायला पुरेसे आहे.. मी तर ठरवलंय.. खूप विचार करून ठरवलय… तुम्हीही साथ द्या ; या तुमच्या लेकीला, जीवाभावाच्या अर्चनाताईला… पर्यायाने आपल्याला सावंतवाडी मतदार संघाच्या समृद्धीला.. पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ताईना साथ द्या तीन नंबरचे लिफाफ्याचे बटन दाबा असे विनम्र आवाहन ऍड नकुल पार्सेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!