आता रडायचं नाही लढायचं
सावंतवाडी ( राजन चव्हाण ) : माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि जिवाभावाची साथ देणाऱ्या भगिनी आणि भाऊंच्या साथीवर आज सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी जाहीर करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस च्या कोकण अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी जाहीर मेळाव्यात जाहीर केले. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या समर्थकांच्या मेळाव्यात अर्चना घारेपरब यांनी आपण अपक्ष उमेदवारी दाखल करत असल्याचे जाहीर केले. महाविकास आघाडीतून शिवसेनेच्या राजन तेली याना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अर्चना घारे परब यांनी समर्थकांचा कार्यकर्ता मेळावा वैश्य समाज भवन हॉलमध्ये आयोजित केला होता.या मेळाव्याला हजारो घारे परब समर्थक उपस्थित होते. यावेळी बोलताना अर्चना घारे परब म्हणाल्या की, महाविकास आघाडीची उमेदवारी मलाच मिळणार, एबी फॉर्म घरात येणार ही खात्री होती. पण महाविकास आघाडीच्या घटक पक्षात अचानक झालेल्या त्या पक्षप्रवेशाने माझी उमेदवारी जाहीर झाली नाही. गेली 7 वर्षे माझ्या भगिनी भाऊ माझ्यासोबत मतदारसंघात सोबत राहिले. मी निवडणूक लढवावी हा सर्वांचाच निर्णय आहे. माझे माहेर मला प्राणप्रिय आहे. आज इथे असणारा हा हजारोंचा समुदाय हा मागील 7 वर्षांत मी कमावलेली जिवाभावाची माणसे आहेत. त्यामुळे त्यांच्याच जीवावर आज अपक्ष उमेदवारी दाखल करत असल्याचे अर्चना घारे परब यांनी जाहीर केले.