आम्हांला आमदार म्हणून हवी फक्त अर्चना…. – ऍड नकुल पार्सेकर
सावंतवाडी (प्रतिनिधी) : राजकारणातला सुसंस्कृतपणा लयाला गेलेला असताना काही आशेचा किरण एखादा सकारात्मक विचार करायला लावणारा छोटासा बिंदू द्रुष्टीपथात पडत असतो. एखाद्या खेळाडूने वर्षानुवर्षे जीव तोडून मेहनत घ्यावी. मोठ्या आत्मविश्वासाने तयारी करावी आणि वशिल्याच्या तट्टूने आयत्या वेळी त्या मेहनतीवर व स्वप्नांवर पाणी टाकावं असाच प्रकार अपक्ष उमेदवार अर्चना घारे- परब यांच्या बाबतीत घडला. मतं मिळवण्यासाठी सगळ्याचं पक्षाचे नेते हे महिला सबलीकरणासाठी आर्जव करत असतात पण जेव्हा त्या महिलेचा हक्क देवून सन्मान करण्याची वेळ येते तेव्हा मात्र अतिशय स्वार्थी राजकारण करून तिचा काटा काढला जातो. ती आली, तीने गेली आठ वर्षे मोठ्या कष्टाने आणि प्रामाणिकपणे या मतदारसंघात बांधणी केली. या मतदारसंघातील प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबात ती पोचली. उन्हा पावसाची तमा न बाळगता पायाला भिंगरी लावून ती फिरली. लोकांनीही तिला आपलीच लाडकी भूमिकन्या म्हणून स्विकारलं. गेल्या पाच वर्षात तीने कुणावरही वैयक्तिक टिका- टिप्पणी न करता मतदारसंघातील फक्त विकासाच्या मुद्द्यावर बोलत होती, अभ्यास करत होती. आजही ती तेच करत आहे. जेष्ठाबद्दल आदराने बोलणे हे संस्कार आहेत. म्हणून ती नेहमीच दीपक केसरकर यांच्या बद्दल बोलताना आदराने बोलते याचा अर्थ तीला निवडणूकीत केसरकरानी मॅनेज केलं असा कुणी काढत असेल तर नेहमीच असे कलुषित विचार ज्यांच्या डोक्यात व वर्तनात दिसतात तो त्यांच्या संस्काराचा भाग झाला.
एक महिला, आपल्या जन्मभूमीत येवून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करते. सचोटी आणि विनम्रता याच्या जोरावर ती या मतदारसंघातील एक चर्चेचा केंदबिंदू बनते याचा अर्थ ती मोठ्या ताकदीने या मातीशी आणि या मातीशी इमान राखणाऱ्या माणसांशी एकरूप आहे म्हणूनच तिला आघाडीची उमेदवारी मिळाली नाही म्हणून शेकडो लोकांच्या डोळ्यातून अश्रू टपकले.निवडणूकीच्या काळात पाकिट वाटून असं प्रेम मिळत नाही. अर्थात तिची निशाणी पाकिटचं आहे पण ते कोरं पाकिट आहे. या परशूरामाच्या भूमीतील जनता ही स्वाभिमानी आहे ती कधीही आपलं इमान विकणार नाही. बऱ्याच जणांनी इच्छा व्यक्त केली की तीने आघाडीचा धर्म पाळावा.. सातत्याने राजकारणात अधर्माचाच वापर करून राजकारणाचा चिखल करणाऱ्यानीचं धर्माच्या गोष्टी कराव्यात. यासारखा दुसरा विनोद नाही. “बाकी कुणीही चालेल पण केसरकर नको” अशी भीमगर्जना करणाऱ्यांनी मग अर्चनाताई का नको? असा विचार का नाही केला? एका बाजूला इतर कुणीही चालेल.. असं म्हणायच व दुसऱ्या बाजूला मीच पाहिजे ही भूमिका कितपत योग्य. ? केसरकरांचा पराभव व्हावा ही अनेकांची मनापासूनची इच्छा होती आणि आहे.. पण त्यांना तेली पराभूत करतील हा फाजील आत्मविश्वास. आघाडीची उमेदवार म्हणून फक्त आणि फक्त तब्बल पंधरा वर्षे सत्ता भोगलेल्या केसरकाराना अर्चनाताईच पराभूत करू शकल्या असत्या हा या मतदारसंघातील मतदारांचा आतला आवाज होता.
नेहमीप्रमाणे अगोदर दोन दिवस तेली यांनी मशाल हाती घेतली तेव्हाच केसरकरांचा विजयाचा कठीण असलेला मार्ग सुकर झाला. अर्चनाताईला जाहीर पाठिंबा दिल्याने जसा त्यांच्यावर आरोप झाला तसा कदाचित माझ्यावरही होवू शकतो. चिखलात उतरल्यावर तो अंगाला लागला म्हणून ओरडून उपयोग नाही… त्याची सवय नसल्याने मानसिक ञास होईल पण जर आमची भगिनी या अशा सिस्टीमच्या विरोधात धीरोदात्तपणे लढायला मैदानात उतरली असेल तर एक भाऊ म्हणून व एक सजग नागरिक म्हणून तिच्या बरोबर मैदानात उतरून तीची पाठराखण केली पाहिजे. अशी रोखठोक भूमिका घेतल्याने होणाऱ्या ञासाची कधी यापूर्वी तमा बाळगली नाही ना यापुढे बाळगणार.












