कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई पोलीस दलातील स्वेच्छा सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनोद मधुकर आचरेकर (वय ५५) यांच्या खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी सिद्धिविनायक संजय पेडणेकर (२४, रा.कोळोशी वरचीवाडी) याला शुक्रवारी 29नोव्हेंबर रोजी जिल्हा न्यायालयात हजर केले असता ३ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी सिद्धिविनायक पेडणेकर याने मृत विनोद आचरेकर यांचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. मात्र विनोद आचरेकर यांचा खुन का केला याचे कारण अजूनही उघड नसल्याचे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांनी सांगितले. विनोद आचरेकर यांनी ऑक्टोबर 2024 मध्ये मुंबई पोलीस दलातून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. त्यानंतर गेल्या चार-पाच दिवसापूर्वी ते आपल्या मूळ गावी कोळोशी येथे आले होते. त्यादरम्यान बुधवारी 27 नोव्हेंबर रोजी रात्री त्यांच्या नात्यातील सिद्धिविनायक पेडणेकर हा जेवण घेऊन श्री आचरेकर यांच्या घरी आला होता. रात्री विनोद आचरेकर व सिद्धिविनायक पेडणेकर यांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर गुरुवारी सकाळी आचारेकर हे रक्ताच्या धारोळ्यात पडलेल्या स्थितीत आढळून आले. तसेच त्या ठिकाणी संशयित सिद्धिविनायक पेडणेकर हाही घटनास्थळी मिळून आला. संशयित पेडणेकर याने आपण खून केल्याची कबुली दिली आहे. मात्र त्याने विनोद आचरेकर यांचा खून का केला याचा तपास कणकवली पोलीस निरीक्षक भरत धुमाळ करत आहेत.दरम्यान मयत विनोद आचरेकर यांचा मृतदेह पोस्टमार्टेम करून कुटुंबीयांच्या ताब्यात पोलिसांनी दिला . शुक्रवारी विनोद यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.