कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली कॉलेज, कनिष्ठ विभागाचा दिनांक २९ व ३० नोव्हेंबर रोजी युवा महोत्सव संपन्न झाला. उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक २९ रोजी सकाळी ठीक ११ वा. एच.पी.सी.एल. सभागृहामध्ये संस्थेच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी प्र. प्राचार्य युवराज महालिंगे, पर्यवेक्षक प्रा. एम के माने, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. हरिभाऊ भिसे, सांस्कृतिक सदस्य प्रा. प्रशांत अमृते, प्रा. एस एस वंजारी, प्रा. विजयकुमार सावंत, प्रा. विजय सावंत सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी डॉ. राजश्री साळुंखे यांनी हा उपक्रम राबविला म्हणून कनिष्ठ विभागाचे भरभरून कौतुक केले. अशा कार्यक्रमातून ” विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळून ते वाढीस लागण्यास मदत होते”. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संस्था, प्राचार्य, सर्व शिक्षक सदैव पाठीशी आहेत. प्राचार्य युवराज महालिंगे यांनी या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा मिळते, कलाटणी मिळते असे सांगत शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. पर्यवेक्षक प्रा. महादेव माने यांनी शिक्षक व विद्यार्थी वर्गाला शुभेच्छा देत कार्यक्रम उत्कृष्ट पणे पार पाडण्याचे आवाहन केले. या उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक प्रा. हरिभाऊभिसे, सूत्रसंचालन प्रा. व्ही. सी. सावंत तर आभार प्रा. व्ही. आर. सावंत यांनी मानले. यावेळी कानिष्ठ विभागाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
उद्घाटन सत्रा नंतर सर्व विभागाच्या वतीने युवा महोत्सव च्या स्पर्धांना सुरुवात करण्यात आली. या स्पर्धामध्ये रांगोळी, मेहंदी, संगीत,गायन, नृत्य (एकेरी व समूह), फॅन्सी ड्रेस, निबंध,वक्तृत्व, कथाकथन, वादविवाद, पोस्टर मेकिंग, चित्रकला, प्रश्नमंजुषा, अभिवाचन, मातीकाम यांचा समावेश होता. स्पर्धांमध्ये इयत्ता अकरावी व बारावी कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यावसायिक अभ्यासक्रम ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला. या स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा दिनांक ३० रोजी दुपारी ठीक ३.३० वाजता संस्था सचिव विजयकुमार वळंजू यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्राचार्य युवराज महालिंगे, पर्यवेक्षक प्रा. महादेव माने, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. हरिभाऊ भिसे, वरिष्ठ लिपिक संजय राणे, सर्व शिक्षक व स्पर्धकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देताना सचिव श्री विजयकुमार वळंजू साहेब यांनी “आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी मेहनती बरोबरच विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. या स्पर्धा आपल्याला प्रगतीचे पंख देतात. आपण केलेल्या मेहनतीचे आपल्याला निश्चितच फळ मिळते “असे सांगितले. प्रा. हरिभाऊ भिसे यांनी पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर प्रा विजय सावंत यांनी सूत्रसंचालन केले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन आणि प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना पारितोषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात करण्यात आले. पर्यवेक्षक प्रा. महादेव माने यांनी सर्वांचे आभार मानले .











