लोकशाही दिनी प्राप्त अर्जांवर तसेच आपले सरकार सेवा पोर्टलवरील अधिसूचित सेवांबाबत गतीने कार्यवाही करा – प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे

नव्याने 88 अर्ज दाखल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आत्तापर्यंत लोकशाही दिनामध्ये आलेल्या 357 प्रलंबित अर्जांवर तसेच आपले सरकार सेवा पोर्टलवरील प्रलंबित अर्जावर गतीने कामे करून, कामे होणार नसतील तर अर्जदारांना कायदेशीर तरतुदी टाकून उत्तरे द्या असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशही दिन प्र.जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. या लोकशाही दिनादिवशी नव्याने 88 अर्ज दाखल झाले. यावेळी अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख शिवाजी भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, महापालिका शहर अभियंता हर्षजीत घाडगे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

प्रभारी जिल्हाधिकारी श्री.शिंदे म्हणाले, प्रत्येक विभागाने नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी आपल्याकडील प्रलंबित अर्जांवर आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी व शुक्रवारी काही तास देवून त्यावर काम करणे आवश्यक आहे. कोल्हापूर जिल्ह्याची निवड सेवा हामी कायद्यांतर्गत पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी केली आहे. त्यामुळे आलेल्या तक्रारी तसेच अर्ज वेळेत पाहून त्यावर निर्णय होणे आवश्यक आहे. प्रलंबित अर्ज वेळेत निकाली काढण्यासाठी तसेच नागरिकांना अधिसूचित सेवा वेळेत देण्यासाठी मोहिम राबवून कामे करा असेही त्यांनी यावेळी निर्देश दिले. सोमवारी झालेल्या लोकशाही दिनादिवशी शासकीय निमशासकीय विषयांकीत कामांच्या प्रशासकीय स्तरावरील वैयक्तिक तक्रारीबाबत न्याय मिळण्यासाठी स्वत: उपस्थित राहून एकुण 88 अर्ज नागरिकांनी सादर केले. त्यापैकी जिल्हाधिकारी कार्यालय 21, जिल्हा परिषद 9, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय 13 व इतर कार्यालये 45 अशी संख्या होती. या लोकशाही दिनाच्या वेळी यापुर्वी दाखल झालेल्या व प्रलंबित असलेल्या 367 अर्जांवरतीही आढावा घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!