विद्यार्थी, नागरिकांनी धावपटूंचे ठिकठिकाणी केले स्वागत
कोल्हापूर (प्रतिनिधी) : विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉनला कोल्हापूर येथे प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे आणि निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी लेझिम, झांज-पथकाचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून 1971 च्या भारत-पाक युद्धातील भारतीय सैन्याच्या विजयाचे स्मरण करून दिले तसेच भारतीय सैनिकांच्या बलिदानाला भावपूर्ण श्रद्धांजलीही वाहिली. भारतीय लष्कराच्या मुख्यालयाच्या दक्षिण कमांडने आयोजित केलेली ही 405 किमी मॅरेथॉन 15 जानेवारी 2025 रोजी पुण्यात होणाऱ्या पहिल्याच आर्मी डे 2025 च्या समारंभाच्या उद्घाटनाचा पडदा उघडणारी आहे. विजय दिवसानिमित्त आयोजित केलेल्या या मॅरेथॉनचा समारोप 16 डिसेंबर रोजी पुण्यात होईल. मॅरेथॉनची सुरुवात 6 डिसेंबर रोजी कुलाबा, मुंबई येथून झाली होती. कोल्हापूर येथील आयोजित 50 किमी अल्ट्रा मॅरेथॉन दरम्यान इतर ठिकाणांहून आलेले पंधरा प्रमुख धावपटू, शंभर स्थानिक धावपटू यात आयर्नमॅनसह इतर 200 धावपटू सामील झाले. शहरातील पाचशेहून अधिक स्थानिक धावपटूंनी अल्ट्रा-मॅरेथॉनला अविस्मरणीय बनवण्यासाठी ठिकठिकाणी सहभाग नोंदविला. विविध मार्गावर पंधराशेपेक्षा जास्त विद्यार्थी धावपटू मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. सुरूवातीला झालेल्या कार्यक्रमावेळी 109 बटालीयन, मराठा लाईट इन्फंन्ट्री रेजिमेंट कोल्हापूर येथील कमांडिंग ऑफिसर आणि इतर वरिष्ठ अधिकारी, सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ॲथलेटिक क्लब, अनुभवी मॅरेथॉनपटू, शाळकरी मुले आणि उत्साही नागरिकांनी धावपटूंचे ठिकठिकाणी स्वागत केले. रस्त्यावर रांगेत उभे राहिलेले नागरिक मनापासून घोषणा देत झेंडे फडकावत होते. तर लहान मुले आणि तरुण खेळाडू धावपटूंसोबत काही अंतरासाठी धावले. यावेळी स्थानिक धावपटू, विद्यार्थी यांच्या सक्रिय सहभागातून कोल्हापूरची क्रीडा संस्कृती आणि सशस्त्र दलांबद्दलचा आदर दिसून आला. 13 डिसेंबर रोजी कोल्हापुरात मिनी माजी सैनिक रॅली होणार असून सशस्त्र दलातील दिग्गजांचा सन्मान याद्वारे सुरुच राहिल. अशा कार्यक्रमाने आपल्या सैनिकांच्या बलिदानाला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून दिग्गज आणि सेवारत जवानांना एकत्र आणले. या रॅलीने सशस्त्र सेना आणि अनुभवी समुदाय यांच्यातील अतूट बंध अधोरेखित केला असे 109 बटालीयन, मराठा लाईट इन्फंन्ट्री रेजिमेंट कोल्हापूर यांनी सांगितले आहे. या अल्ट्रा मॅरेथॉनचे उद्घाटन 6 डिसेंबर रोजी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले होते. नाशिक आणि अहिल्यानगरमधून या मॅरेथॉनचा प्रवास झाला. पुण्यात सांगता होण्यापूर्वी कोल्हापूरमधे या मॅरेथॅनचे आयोजन करण्यात आले होते.
14 डिसेंबर रोजी मॅरेथॉनमधील सहभागी धावपटूंना त्यांच्या अविश्वसनीय प्रवासाचा शेवटचा टप्पा म्हणून कोल्हापूर ते पुणे ध्वज दाखवून समारंभपूर्वक मार्गस्थ करण्यात येणार आहे. यात 15 प्रमुख धावपटू, ज्यांनी 11 दिवस पाच शहरांमध्ये भारतीय सैन्याचा आत्मा पुढे नेला आहे. भारतीय सैन्यदलाने कोल्हापूर शहराचे अविस्मरणीय पाठिंबा आणि सहभागाबद्दल मनापासून आभार मानले आहेत. कोल्हापूर येथे झालेल्या मॅरेथॉन वेळी शहरातील विविध शाळा महाविद्यालयांनी मार्गावर ठिकठिकाणी सहभागी धावपाटूंना प्रोत्साहन देण्यासाठी शालेय विद्यार्थी उपस्थित केले होते. यात करवीर प्रशाला विद्यामंदिर, भाई माधवराव हायस्कूल, आंबूबाई पाटील इंग्लीश स्कूल, सेव्हन्थ डे हायस्कूल, ओरीएंटल हायस्कूल, कोरगांवकर हायस्कूल, माईसाहेब बावडेकर हायस्कूल, छत्रपती राजाराम हायस्कूल, दत्ताबाळ इंग्लिश मेडियम स्कूल, छ.शाहू विद्यालय, दादासाहेब मगदूम हायस्कूल, एस्तेर पॅटर्न हायस्कूल, राजर्षी छ.शाहू महाविद्यालय, राजाराम महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठातील खेळाडू, एनएसएस, एनसीसीचे विद्यार्थी, शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांचा सहभाग होता.