महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतून कोल्हापूर येथे रंगणार नाट्यरंग सोहळा

६३ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन

१५ डिसेंबर पर्यंत सहभागी वेगवेगळ्या २० नाटकांचे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. २५ नोव्हेंबर २०२४ पासून राज्यातील विविध २४ जिल्हास्तरावरील केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. राज्य नाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर या केंद्रावरील स्पर्धेचे उदघाटन आज राजर्षी शाहू छत्रपती स्मारक येथे सायंकाळी ७ वाजता मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. उद्घाटन अध्यक्ष, अखिल भारतीय नाट्य परिषद, कोल्हापूर शाखा आनंद कुलकर्णी, उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परीक्षक अविनाश कोल्हे, प्रवीण शांताराम, पूर्वा खालगावकर उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते आबा कुलकर्णी, कोल्हापूर लिथो प्रेसचे हर्षराज कपडेकर, राजर्षी शाहू स्मारक भवन येथील ज्येष्ठ कर्मचारी आनंदा देसाई यांचा सन्मान त्यांचा नाट्य क्षेत्रातील योगदानाबद्दल करण्यात आला. पहिल्या दिवशी रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाने सुरुवात झाली.

सृजन आणि सर्जनचा अविष्कार वेगवेगळ्या सहभागी २० नाट्य स्पर्धकांमार्फत सादर होणार आहे. यामध्ये ऐतिहासिक पद्धतीचे नाट्य पाहायला मिळणार असून कोल्हापूर जिल्ह्यातील नाट्य रसिकांना ती शाहू स्मारक नाट्यगृहात पाहायला मिळणार आहेत. दरवेळी केशवराव नाट्यगृहात होणारी ही स्पर्धा शाहू स्मारकात येत्या १५ डिसेंबर पर्यंत असणार आहे. उद्घाटन सोहळ्यात सूत्रसंचालन पंडित कंदले यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन प्रशांत जोशी यांनी पाहिले.

१५ डिसेंबर पर्यंत ही स्पर्धा सुरू असून जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे सहसंचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत मराठी रंगभूमी समृध्द करण्याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आतापर्यंत महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेची गौरवसंपन्न ६२ वर्ष अविरत वाटचाल चालू आहे. ज्यातून अनेक नाटककार, अभिनेते, तंत्रज्ञ व दिग्दर्शक निर्माण झाले आहेत. त्यांनी नवनवीन प्रयोग करुन या उपक्रमास व मराठी रंगभूमीस समृध्द करुन वैश्विक स्तर प्राप्त करुन दिला आहे, अशी माहितीही श्री. पांडे यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!