भिरवंडे ग्रामपंचायतमध्ये भरली शाळा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला उपक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केला असून त्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे शिक्षक सहभागी झाल्याने मंगळवार 14 मार्चपासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या उद्देशाने भिरवंडे ग्रामपंचायत ने पुढाकार घेत ग्रामपंचायतच्या सभागृहात सोमवारी शाळा भरविली. या शाळेमध्ये शिक्षण क्षेत्रातील तज्ञ ग्रामस्थ ,मुंबईकर व पालक मार्गदर्शन करत आहेत. ही शाळा शिक्षकांचा संप मिटेपर्यंत सुरू राहणार असल्याचे भिरवंडे सरपंच नितीन सावंत यांनी सांगितले.

कोरोना कालावधीमध्ये शाळा बंद राहिल्याने मागील दोन वर्ष विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले होते. त्यातच यावर्षी सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होऊन त्यात शिक्षक सहभागी झाल्याने केले पाच ते सहा दिवस मुले घरीच आहेत.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये ती शिक्षणापासून ,शाळेपासून दूर राहू नयेत या उद्देशाने सिंधुदुर्ग बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सभागृहात शाळा भरविण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वप्रथम भिरवंडे ग्रामपंचायत मध्ये शाळा भरविण्याचा हा उपक्रम राबविला आहे सोमवारी भरलेल्या या शाळेमध्ये निवृत्त गटशिक्षणाधिकारी तथा साने गुरुजी कथामालाचे राज्य उपाध्यक्ष मोहन सावंत, मुंबई भांडुप येथे अनेक वर्ष दत्तकृपा क्लासेस चालविणारे मुरडवेवाडी येथील संजय सावंत यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील तज्ञ व ग्रा. प. सदस्य रश्मी सावंत, प्रमिला सावंत, मनीषा सावंत, पालक साक्षी सावंत यांनी मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत मध्ये भरलेल्या शाळेत 30 पैकी 25 विद्यार्थी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना सिंधुदुर्ग बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्याकडून खाऊ तर दिर्बा रामेश्वर दूध डेअरी भिरवंडे यांच्याकडून दुधाचे वाटप करण्यात आले.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगेश सावंत. देवालये संचालक मंडळाचे पदाधिकारी संदीप सावंत, पालक अरविंद सावंत, संदीप सावंत, राजश्री सावंत, ग्रा.प.कर्मचारी विशाल सावंत, ऋषिकेश सावंत, शितल राणे, दिलीप पवार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!