एकेरी वाहतूक सुरु
नांदगाव (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव कोळंबा मंदिर नजिक असलेल्या कृपासिंधू कॉम्प्लेक्स जवळ आज दुपारी 12.45 दरम्यान मालवणहून इचलकरंजी येथे जनरेटर वाहतूक करणाऱ्या वाहनाला अपघात झाला आहे. हा अपघात रस्त्यावर आडवा आला असल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे. जनावर आडवं आल्याने हा अपघात झाल्याचे वाहन चालकाने सांगितले आहे.
सुदैवाने कोणी जखमी झाले नसून वाहनाचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातामुळे गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनमधून एकेरी वाहतूक सुरु आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून वाहनाला बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यावेळी महामार्ग पोलिस दिलिप पाटील, सुधीर घारकर, दत्ता कांबळे, सुमित चव्हाण, होमगार्ड नरसाळे, पाटील आदींनी धाव घेतली आहे.