देवगड (प्रतीनिधी) : प्रत्येकाने प्रयोगशील शेतकरी बनले पाहिजे, ज्या प्रमाणे आपल्या शरीराला गरजेपेक्षा जास्त अन्न खाल्ल्याने त्रास होतो त्याच प्रमाणे जमिनीला देखील प्रमाणापेक्षा जास्त खताची मात्र टाकल्याने जमिनीचा पोत ढासळतो. असे प्रतिपादन कृषी तंत्रनिकेतन देवगड येथील प्राध्यापक विनायक ठाकुर यांनी केले. या दरम्यान त्यांनी उपस्थित त्यांना गोकृपा अमृत, जीवामृत, दशपर्णी अर्क यासारख्या सेंद्रीय पदार्थांची माहिती देत मार्गदर्शन केले.
जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून कृषी विभाग महाराष्ट्र शासन व कृषी विभाग केंद्र सिंधुदुर्ग आणि IQAC श्री. स. ह. केळकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय माती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी कृषी तंत्रनिकेतन देवगडचे प्राध्यापक विनायक ठाकूर शिक्षण विकास मंडळ देवगड संस्थेचे पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक,जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.
विभागीय कृषी अधिकारी ओहोळ यांनी मृदा चाचणीची गरज, मातीच महत्त्व आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले. तालुका कृषी अधिकारी श्रीम. आरती पाटील यांनी यांत्रिकीकरण आणि बेसुमार रासायनिक घटकांमुळे जमिनीचा पोत कसा ढासळत चाललेला आहे आणि त्यामुळे मानवी आरोग्यावर कसा परीणाम होतो याची सविस्तर माहिती आपल्या भाषणात सांगितली. श्री. हडकर यांनी मुलांना, शेतकऱ्यांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून माती परीक्षण करताना माती नमूना कसा जमा करवा याची सविस्तर माहिती दिली. संस्थेचे सभापती व प्रगतशील शेतकरी बागायतदार श्री. एकनाथ तेली यांनी कृषी विभाग व आपण सर्वांनी मिळून शेती मध्ये येणाऱ्या नवीन आव्हानांचा सामना करू व शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारी माती परीक्षण प्रयोगशाळा लवकरात लवकर कार्यान्वित करू अशी ग्वाही दिली.
माती ही एक अमूल्य नैसर्गिक संपत्ती आहे याची प्रत्येकाला जाणीव व्हावी. मातीचे चांगले आरोग्य हे माणसाचे आरोग्य चांगले ठेवते. काही दशकापासून मातीचे आरोग्य बिघडत जाणे ही चिंतेची गंभीर बाब आहे. भारताचा नागरिक या नात्याने, मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, जेणेकरुन येत्या वर्षांमध्ये मृदा उत्पादक राहील, आणि मानवी जीवनावर त्यामुळे सकारात्मक परिणाम होईल. त्यामूळे प्रत्येकाने या कार्यक्रमाच्या निमित्ताने सोबत शपथ घेतली की, “माझ्या प्रियजनांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये मातीच्या आरोग्याविषयी जागरुकता वाढवीन. मातीच्या बेसुमार शोषणाला विरोध करेन आणि इतरांनाही विरोध करण्यास सांगेन. माझ्या गावातील किंवा जवळपासच्या गावातील किमान 10 शेतकऱ्यांना त्यांच्या मातीची वेळोवेळी चाचणी करून घेण्यासाठी आणि मृदा आरोग्य कार्डाच्या शिफारशींनुसार मृदा आरोग्य व्यवस्थापनाचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहित करेन”. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. नितीन वळंजू यांनी प्राचार्यांच्यावतीने सर्व उपस्थितांचे आभार मानून उत्तम प्रकारे सूत्रसंचालन केले.