अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद
पोलीस निरीक्षक विजय यादव यांचे परफेक्ट तपासकाम
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील काळसे येथे भरधाव वेगात बेदरकारपणे डंपर चालवून एका महिलेच्या मृत्यूला तर चार महिलांना गंभीर जखमी होण्यास कारणीभूत ठरलेला डंपरचालक आरोपी इलाकस शेरखान याचा जामीन अर्ज प्रधान जिल्हा न्यायाधीश भारुका यांनी फेटाळला. 9 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास काळसे येथे दारूच्या नशेत बेदरकारपणे डंपर चालवून डंपर चालक शेरखान याने पादचारी महिलांना ठोकरले होते. यात एक महिला ठार झाली होती तर चौघी गंभीर जखमी झाल्या होत्या. या अपघातानंतर मोठा जनक्षोभ उसळला होता.त्यातच चालक शेरखान हा दारूच्या नशेत डंपर चालवत होता हे उघड झाले होते, डंपर मध्ये 750 मिली लिटर ची दारूची अर्धी संपलेली बाटली आढळली होती.पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी घटनास्थळाची वस्तुस्थिती दर्शक पाहणी करत पंचयादी बनवली होती. त्यानुसार चालक शेरखान याने भरधाव वेगाने अपघात होऊ शकतो हे माहीत असूनही बेदरकारपणे डंपर चालवत हा अपघात केला होता हे तपासात उघड केले होते.न्यायालयीन कोठडीत असलेल्या शेरखान याने प्रधान जिल्हा न्यायाधीशांकडे जामीन अर्ज सादर केला होता. या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली.अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तोडकरी यांनी चालक शेरखान हा दारूच्या नशेत भरधाव वेगाने डंपर चालवत होता, त्याने अपघात होऊ शकतो हे त्याला माहित होते, वस्तुस्थिती दर्शक पंचनाम्यानुसार या बाबी स्पष्ट होत असल्याने आरोपी शेरखान चा जामीन अर्ज नामंजूर करावा असा युक्तिवाद केला.तोडकरी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत प्रधान जिल्हा न्यायाधीश भारुका यांनी आरोपी शेरखान चा जामीन अर्ज फेटाळला.