स्टॉलधारकांनी नगरपंचायत कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्येच कोंडले

वैभववाडीतील घटनेने खळबळ ; कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरात कित्येक दिवस स्टॉल हटविल्याच्या पार्श्वभूमीवर स्टॉल धारक व नगरपंचायत प्रशासन यांच्यात वाद विवाद होत आहेत. त्यातच स्टॉल हटविलेल्या जागी पुन्हा स्टॉल उभारल्याचे लक्षात येताच नगरपंचायत प्रशासनाकडून ते स्टॉल आज जप्त करण्यात आले.या रागातून नगरपंचायत कर्मचाऱ्यांना ऑफिसच्या दाराची कडी लावून कोंडून ठेवण्याचा प्रकार आज सायंकाळी घडला. स्टॉल हटाव मोहिमेनंतर वैभववाडीत काही स्टॉल धारकांनी स्वतः पर्यायी जागा शोधून आपले स्टॉल स्थलांतरित करत आपला व्यवसाय सुरू देखील केला आहे.तर काही स्टॉल धारक आपल्याला पर्यायी जागा उपलब्ध करून द्या या मागणीवर अद्याप ठाम आहेत. गेल्या काही दिवसांपासून काही स्टॉल धारकांनी पुन्हा नगरपंचायत परिसरात तात्पुरत्या स्वरूपात छोटे स्टॉल टाकले होते त्यात दिवसेंदिवस पुन्हा वाढ होत असल्याचे लक्षात येताच मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी सदरचे स्टॉल जप्त केले. याचा राग मनात धरून काही वेळातच सदरच्या स्टॉल धारकांनी नगरपंचायतचे मुख्याधिकारी सुरज कांबळे नगरपंचायत कार्यालयात उपस्थित नसताना इतर कर्मचारी कार्यालयात असल्याचे पाहून आज सायंकाळी ६ च्या सुमारास नगरपंचायतच्या दोन्ही मुख्य प्रवेशद्वाराची कडी लावून काही काळ कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. काही काळानी आपली कृती योग्य नसल्याचे लक्षात येताच प्रवेशद्वाराची कडी संबंधित व्यक्तिकडून काढण्यात आल्याचे समजते. यामुळे कर्मचारी वर्गामध्ये एकच खळबळ उडाली असून सदर प्रकारामुळे नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!