कणकवली (प्रतिनिधी) : “कुतूहलातून निरीक्षण व निरीक्षणातून संशोधन करून त्या नोंदी ठेवल्या नसत्या त्यातून निष्कर्ष काढले नसते तर आज आपण माकडासारखे झाडावर असतो. निसर्गातल्या प्रत्येक गोष्टी मागचं विज्ञान समजून घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे.”असे जीवन शिक्षण शाळा, गोपुरी येथे मुलांशी सहज संवाद साधत कणकवली महाविद्यालायाचे सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. सुरेश पाटील यांनी विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज अधोरेखित केली.
गोपुरी आश्रम वागदे मार्फत घेण्यात येणाऱ्या जीवन शिक्षण शाळा या आगळ्यावेगळ्या उपक्रमात रविवार दिनांक ८ डिसेंबर,२०२४ रोजी पाचवी ते नववीतील साठ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी वेगवेगळे विज्ञान प्रयोग व खडकांची माहिती वसुंधरा विज्ञान केंद्र नेरूर, कुडाळ या संस्थेच्या माध्यमातून प्रत्यक्ष प्रयोग करून समजून घेतली. वसुंधरा विज्ञान केंद्राच्या प्रशिक्षक श्रीमती रेणुका नागोळकर, सौ. नेहा नाईक, श्री. मंथन धुरी व श्रीमती पूर्वा परब यांनी वैज्ञानिक प्रयोग व त्या संकल्पनांची जीवनातील उपयुक्तता उपस्थित विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप सावंत यानी केले. सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेतली. संस्थेचे सचिव विनायक मेस्त्री यानी प्रशिक्षकांचे स्वागत केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसुंधरा विज्ञान केंद्राचे प्रा. सतिश नाईक, गोपुरी आश्रमाचे सदाशिव राणे, गुरुनाथ तेंडुलकर, अर्पिता मुंबरकर, विनायक सापळे यानी विशेष प्रयत्न केले. यावेळी बिन भिंतीची ही शाळा अनुभवण्याकरिता मुंबईहून सामाजिक कार्यकर्ते सुधीर वेंगुर्लेकर व गुहागर येथील हेरंब कानडे व पालक उपस्थित होते.