वैभववाडी (प्रतिनिधी) : प्लास्टिक बंदीवर वैभववाडी नगरपंचायत ॲक्शन मोडवर आले असून प्लास्टिक पिशवी साठवणूक प्रकरणी वैभववाडी बाजारपेठेतील नऊ व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत 4 हजार 500 रुपयांचा दंड नगरपंचायतीने वसूल केला आहे. नगरपंचायतच्या धडक कारवाईमुळे सर्वांचेच भावे दणाले आहेत.
वैभववाडी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक सतीश सांगेलकर यांच्या फिरत्या पथकाद्वारे शहरातील स्थानिक व्यापारी पळविक्रेते किराणा दुकाने अशा ठिकाणी प्लास्टिक जप्तीची कारवाई करण्यात आली. यामध्ये 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक संबंधित व्यापाऱ्यांकडून चार हजार पाचशे रुपये इतका दंड स्वच्छता निरीक्षक सतीश सांगेलकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
प्लास्टिकमुळे पर्यावरणाची हानी होत असल्यामुळे शासनाने प्लास्टिक बंदी केली आहे. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. प्लास्टिक पिशवी बंदी असूनही व्यापारी व नागरिकांकडून सर्रास प्लास्टिक पिशव्याचा वापर केला जात आहे.यावर निर्बंध घालण्यासाठी नगरपंच्यातीने कडक कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी अशा प्रकारे धडक कारवाई यापुढेही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शहरातील सर्व व्यापारी व नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करून कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करावा.असे आवाहन मुख्याधिकारी थोरात यांनी केले आहे.