आपला सिंधुदुर्ग न्यूज इम्पॅक्ट

ब्लड कॅन्सरग्रस्त 3 वर्षीय काव्या शेळकेच्या उपचारासाठी कणकवलीच्या मैत्रांगण ग्रुपकडून रोख 25,500/- मदत

माणुसकीचा पाझर फुटला…मदतीचा ओघ सुरू झाला

कणकवली (प्रतिनिधी) : ब्लड कॅन्सरग्रस्त 3 वर्षीय काव्या शेळके हिच्या वैद्यकीय उपचारासाठी कणकवली शहरातील एस एम हायस्कुल च्या 1999 च्या एस एस सी बॅच ने आपला खारीचा वाटा उचलला असून रोख 25 हजार 500 रुपये काव्याच्या वडिलांकडे पोहोच केले आहेत. मालवण तालुक्यातील आचरा गावातील 3 वर्षीय काव्या हिला ब्लड कॅन्सर झाल्याचे निदान झाले आणि तिच्या कुटुंबाच्या पायाखालची वाळूच सरकली. अवघ्या 3 वर्षाच्या आपल्या काळजाच्या तुकड्याला ब्लड कॅन्सर सारखा अतिगंभीर आजार झाल्याचे समजताच आर्थिक स्थिती अत्यंत बेताची असलेल्या काव्याच्या वडिलांनी तिच्या उपचारासाठी शर्थीने प्रयत्न केले. सध्या गोवा बांबुळी येथे काव्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. काव्याच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन सर्वप्रथम आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज ने प्रसारित केले. त्यानंतर सोशल मिडियासह प्रिंट मीडियातही काव्याच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदतीच्या आवाहनाची बातमी प्रसिद्ध झाली. कणकवली शहरातील गौरव गवाणकर मित्र परिवाराने रोख 35 हजार रक्कमेसह जीवनावश्यक वस्तू, फोंडाघाट येथील किशोर सामंत उर्फ आप्पा यांनी रोख 25 हजार, तळेरे येथील ग्रुपकडून रोख 11 हजार अशी आर्थिक मदत जमा झाली. कणकवलीतील एस एम हायस्कुल च्या 1999 च्या एसएससी बॅच मधील मैत्रांगण ग्रुपमधील वर्गमित्रांनी माणुसकी धर्म जपत स्वकमाईचा काही हिस्सा गोळा केला आणि त्यातून रोख 25 हजार 500 ची रक्कम जमा झाली. मैत्रांगण ग्रुपच्या वतीने विनू महाडिक यांनी गोवा बांबुळी येथे जाऊन काव्याचे वडील चंद्रशेखर शेळके यांच्याकडे वरील रक्कम सुपूर्त केली. काव्या हिच्या तब्बेतीची आस्थेने विचारपूस करत काव्या ही लवकरात लवकर या आजारातून बरी होऊन सुखरूप घरी येवो अशी प्रार्थनाही केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!