आचरा (प्रतिनिधी) : नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी अशी ख्याती असलेल्या चिंदर गावचे आराध्य दैवत भगवती माऊली देवीच्या यात्रौत्सवात काल भक्तांचा महापूर लोटला. सकाळी विधिवत पूजा, बारापाचं मानकरी यांच्यावतीने गाऱ्हाणे (साकडे) घालून दर्शनाला सुरुवात झाली दुपार पर्यंत नवस फेडणे, माहेरवाशीनीची ओठी भरणे, दर्शनासाठी भक्ताच्या लांबच लांब रांगा पहायला मिळाल्या.
दुपार पासून गर्दी आणखीनच वाढत गेली. रात्री 1.30 वाजता देव डाळपस्वारी भगवती माऊली मंदिरात असंख्य भाविक भक्तांन सह फटाक्याच्या आतषबाजीत, ढोल, ताश्यासह “हर हर महादेवच्या गजरात” दाखल झाली. त्या नंतर पुराण वाचन व महाराष्ट्रात भगवती माऊली यात्रा प्रसिद्ध असलेलं दिंडे नृत्य ‘आई उदो गं उदोच्या’ जयघोषात भक्तीमय वातावरणात साजरा झाला. गोंधळ, कीर्तन व आरतीने आजच्या पहिल्या दिवसाची समाप्ती झाली.