14 ते 18 डिसेंबर रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम
आचरा (प्रतिनिधी) : वैभवशाली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेली चिंदर गावची दिंडे जत्रा 14 डिसेंबर रोजी होतं असून सकाळी भगवती माऊलीची विधिवत महापूजा, बारापाचं मानकरी यांच्यावतीने भगवती माऊलीला साकडे, सकाळी 9 वाजता यात्रेकरू भाविकांचे स्वागत व भगवती माऊलीच्या दर्शनाला सुरुवात, सकाळी 11 वाजल्या पासून भगवती माऊलीस मानकर्याचा महाप्रसाद अर्पण, दिवसभर देवी ओटी, नवस, साकडे आदी, रात्रौ अकरा वाजल्या नंतर ढोलताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत रामेश्वर मंदिराकडून ग्रामदेवतांच्या तरंगांचे भगवती मंदिरांत आगमन होणार आहेत. पहाटे तीन वाजता पुराण गोंधळ व दिंडे जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवीच्या दिवट्यांचे नृत्य होणार आहे.
रविवार 15 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून स्थानिक भजने होणार आहेत. यात श्री देव रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ देवूळवाडी, श्री देव ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ साटमवाडी, रात्री साडेसात ते साडेआठ दरम्यान गावडे पुरुष प्रासादिक भजन मंडळ गावडेवाडी यांचे भजन होणार आहे. रात्रौ 9 वाजल्यानंतर पुराण, किर्तन श्रींची आरती आदी कार्यक्रम होणार आहेत.
सोमवार 16 डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजल्या पासून स्थानिक भजने यात श्री सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ सडेवाडी, श्री देव गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ पालकर वाडी, श्री देव वाडत्री ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ कोंड अपराजवाडी यांचे भजन, श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ कुंभारवाडी यांचे भजन होणार आहे. मंगळवार 17 डिसेंबर रोजी श्री देव ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ लब्दे वाडी, श्रीदेव ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ तेरई वाडी, श्री देव आकारी ब्राम्हणदेव प्रासादिक भजन मंडळ गावठण वाडी यांचे भजन होणार आहे. रात्रौ नऊ वाजता पुराण गोंधळ किर्तन, आरती आदी कार्यक्रम. बुधवार 18 डिसेंबर रोजी दुपारी तीन ते सहा चालू वहिवाट दार सर्व महिला, वेदिका घाडी, प्रेरणा घाडी, प्राजक्ता घाडी, आराध्या घाडी, सोनाली घाडी यांच्या मार्फत हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी सहा नंतर स्थानिक भजने यात श्री देव पिसाळी ब्राम्हण देव प्रासादिक भजन मंडळ तेरई, श्री देव भगवती प्रासादिक भजन मंडळ भटवाडी यांची भजने होणार आहेत. रात्रौ दहा वाजता जय हनुमान पारंपरिक दशावतारी नाट्य मंडळ ओरोस दांडेली यांचे दशावतारी नाटक “विंध्य वासिनी विंद्येश्वरी” हा दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहे. यानंतर रात्रौ 2.30 नंतर गोंधळ किर्तन, लळित समाप्ती व दिवट्या नृत्य आदी कार्यक्रम होणार आहेत. तरी भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन बारापाच मानकरी व श्री देवी भगवती माऊली सेवा समिती चिंदर, ग्रामस्थ याच्यावतीने करण्यात आले आहे.