सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते- प्रा. हरिभाऊ भिसे

कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली शिक्षण संघ मुंबई, कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, कळसुली प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रम स्कूल कमिटी चेअरमन के.आर.दळवी यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे हरिभाऊ भिसे (प्राध्यापक, कणकवली कॉलेज कणकवली) यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी हरिभाऊ भिसे यांनी विद्यार्थ्यांना खुमासदार शैलीत सकारात्मक विचारांचे महत्त्व स्पष्ट केले. मालवणी भाषेचा गोडवा मालवणी कवितेतून विद्यार्थ्यांसमोर सादर करत आपल्या मराठी भाषेतील काही नवीन शब्दांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. नवीन पीढीने आपला सांस्कृतिक वारसा जोपासावा व देशाचे नाव उंचवावे असा मोलाचा संदेशही त्यांनी दिला. त्यांच्या अप्रतिम व्याख्यानाने सर्व विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले.

या कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कार देण्यात आले. यावेळीचा मानाचा आदर्श शिक्षक पुरस्कार अमर पांडुरंग पवार यांना प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार हा कै.अर्जुन श्रीधर दळवी यांच्या स्मरणार्थ श्री.दिनेश अर्जुन दळवी यांनी प्रायोजित केला आहे. तर सूर्यकांत दळवी प्रायोजित यावर्षीचा आदर्श पालक पुरस्कार हा सौ. श्वेता श्रीकृष्ण दळवी यांना देण्यात आला. संपूर्ण प्रशालेतून आदर्श विद्यार्थी पुरस्काराने कु. पूर्वा राजेश घाडीगावकर हिला गौरविण्यात आले. याचप्रमाणे प्रशालेतून आदर्श स्वयंसेवक म्हणून कु. गौरव भालेकर याला सन्मानित करण्यात आले. याचबरोबर एस.एस. सी. व एच. एस.सी. परीक्षेमध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी तसेच प्रशालेमध्ये आयोजित निबंधस्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, शालेय क्रीडा स्पर्धा, गीत-गायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा इ. मध्ये विशेष यश प्राप्त विद्यार्थ्यांचा पारितोषिके देवून गुणगौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये सूर्यकांत राजाराम दळवी- (कार्याध्यक्ष, कळसुली शिक्षण संघ, मुंबई),श्रीधर विष्णू दळवी- (सल्लागार व माजी अध्यक्ष – कळसुली शिक्षण संघ, मुंबई), प्रभाकर दळवी – (उपकार्याध्यक्ष – कळसुली शिक्षण संघ, मुंबई), प्रकाश दळवी – (सल्लागार -कळसुली शिक्षण संघ मुंबई ), नामदेव घाडीगावकर – (व्हाईस चेअरमन -स्कूल कमिटी), डी. जी. तेली (माजी व्हॉइस चेअरमन – स्कूल कमिटी), रजनीकांत सावंत(सदस्य – स्कूल कमिटी), शुभदा देसाई (सदस्या- स्कूल कमिटी), शिवाजी गुरव – (अध्यक्ष – शाळा व्यवस्थापन समिती), जी मुरकर- (उपाध्यक्ष- शिक्षक पालक संघ), शिवप्रसाद घाडीगावकर, रामचंद्र सावंत – शिक्षक पालक संघ सदस्य , नीता गुरव -शिक्षक पालक संघ सदस्या, कवडे मॅडम- मुख्याध्यापिका जि. प.शाळा कळसुली नं. १, श्वेता दळवी, दिलीप दळवी,दिलीप सावंत, प्रमिला प्रमोद दळवी,चंद्रसेन गोसावी – माजी वरीष्ठ लिपिक, विराज गोसावी – पत्रकार, भाई गावकर- पोलीस पाटील दिवाकर दळवी आजी-माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेख-कथा-कविता इ. साहित्यिक लेखन तसेच विविध चित्रे असलेले हस्तलिखित ‘कळस’ चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वतीपूजन याने करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी सुमधूर आवाजात ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापक व्ही.व्ही.वगरे यांनी प्रशालेच्या विविध उपक्रमांची माहिती देत या कार्यक्रमाचा उद्देश आणि स्वरूप विशद केले. प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक एस. के. सावळ यांनी वर्षभरातील घडलेल्या ठळक घडामोडींच्या अहवालाचे वाचन केले व विविध आंतर तसेच शालाबाह्य स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, स्पर्धा परीक्षा यांतील विद्यार्थ्यांच्या यशाच्या संपादणूकीचे सादरीकरण केले. मान्यवरांच्या मनोगतामध्ये प्रकाश दळवी, एस.व्ही.दळवी, प्रभाकर दळवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तर सूर्यकांत दळवी यांनी संस्थेच्या प्रदीर्घ यशस्वी वाटचालीमध्ये संस्था पदाधिकारी, मुंबई स्थित संस्था सदस्य, आजी-माजी विद्यार्थी पालक ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगून त्यांचे प्रेम आणि सहकार्य असेच सदैव सोबत रहावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुंबई स्थित पदाधिकारी पुरुषोत्तम सदाशिव दळवी- अध्यक्ष कळसुली शिक्षण संघ, मुंबई तसेच विजय पांडुरंग सावंत- सरचिटणीस – कळसुली शिक्षण संघ, मुंबई आणि इतर मान्यवर पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
आपल्या अध्यक्षीय भाषणात के.आर.दळवी यांनी विद्यार्थ्यांना सद्यपरिस्थितीमध्ये संस्काराची शिदोरी फार महत्त्वाची असून विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या कष्टाची जाणीव ठेवावी तसेच उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठाचा व संधीचा योग्य वापर करून आपला उत्कर्ष साधावा असा मोलाचा संदेश दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनाची धुरा ए.जी.सावंत यांनी सांभाळली.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात संध्याकाळी ‘विविधतेतून एकता’ या संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांचा विविध कला गुणदर्शन कार्यक्रम सदर करण्यात आला. यामध्ये लावणी नृत्य, शेतकरी नृत्य, कोळी नृत्य याचबरोबर देशातील विविध नृत्यप्रकारांची झलक असलेले विविधांगी कार्यक्रम, व्यसनमुक्ती वर आधारित बालनाट्य, रामायणावर आधारित नाटिका, गीत गायन, हास्य यात्रा, एकलव्य कथाअशा विविध कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. यावेळी सदर केलेले मुलींचे दशावतार नाटक रसिक प्रेक्षकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अश्मित मुळीक, कु. मंदार वरक, कु.मेघा दळवी, कु.रिया तांबे, कु. पूर्वी सावंत, कु. कार्तिकी पार्सेकर आणि श्री. ए.जी.सावंत यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांचे तसेच या कार्यक्रमाचे आयोजक व मार्गदर्शक मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे संस्था पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी यांच्याकडून कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी मान्यवरांच्या हस्ते कळसुली शिक्षण संघ, मुंबई संस्थेच्या ‘दिनदर्शिका २०२५’ चे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. अमर पवार- सांस्कृतिक विभाग प्रमुख, कु.संस्कार पाडावे- शालेय स्वराज्य सभा – मुख्यमंत्री यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या सांस्कृतिक रंगमंचासाठी प्रायोजक म्हणून प्राणजीवन सहयोग संस्था , शिरवल याचे संस्थापक अध्यक्ष श्री. संदीप चौकेकर यांचे योगदान लाभले. या कार्यक्रमासाठी अनेकांनी आर्थिक साहाय्य केले तसेच बक्षिसे दिलीत अश्या सर्व दानशूर व्यक्तींचे सांस्कृतिक विभाग प्रमुख व प्रशालेचे मुख्याध्यापक यांनी आभार प्रकट केले. या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. अमर पवार यांनी मार्गदर्शक व सहकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थ यांचे हृदयपूर्वक आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!