कुडाळ येथील संत राऊळ महाराज काॕलेज या केंद्रावर होणार परीक्षा
ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरती २०२१ मधील पोलीस शिपाई चालक पदाच्या २२ पदासाठी लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या २५३ उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार २६ मार्च रोजी सकाळी ८-३० वा. कुडाळ येथील संत राऊळ महाराज काॕलेज या केंद्रावर घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलात रिक्त असलेल्या १२१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये २२ चालक तर ९९ कॉन्स्टेबल या पदांसाठी भरती होत आहे. चालक पदाच्या २२ पदांसाठी २ हजार १३६ अर्ज आले होते. तर ९९ कॉन्स्टेबल पदासाठी ५ हजार ९५८ अर्ज आले होते. चालक पदासाठी २ ते ४ जानेवारी या कालावधीत मैदानी परीक्षा घेण्यात आली. तर कॉन्स्टेबल पदासाठी ५ ते ११ जानेवारी या कालावधीत मैदानी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर चालक पदासाठी घेण्यात आलेल्या मैदानी परीक्षेत रिक्त जागांच्या एकास दहा या प्रमाणे समांतर आरक्षणानुसार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. तर मागाहून कॉन्स्टेबल पदासाठी लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली होती. या बाबतची यादी २२ मार्च रोजी www.sindhudurgpolice.gov.in या संकेत स्थळावर उमेदवाराचे नाव, अर्ज नंबर व चेस्ट नंबर यासह प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यातील चालक पदासाठी लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या २५३ उमेदवारांची लेखी परीक्षा २६ मार्च रोजी जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा कुडाळ येथील संत राऊळ महाराज कॉलेज येथे सकाळी ८.४० वाजता सुरू होणार आहे. या लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र हे ‘महाआयटी’ मार्फत आॕनलाईन पद्धतीने डाऊनलोड करण्यास उपलब्ध आहे. परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी दोन तास अगोदर पोहोचणे आवश्यक आहे. या संदर्भात काही अडचण, समस्या असल्यास उमेदवारांनी पोलीस नियंत्रण कक्ष ०२३६२- २२८६१४ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी केले आहे.