विजयदुर्ग किल्ला पर्यटक विसावा केंद्राचे उदघाटन
विजयदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या वतीने किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या उपक्रमाला नेहमीच सहकार्य मिळेल. विजयदुर्ग पर्यटनाच्या दृष्टीने सर्वदूर पसरवून येथील स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट या समितीने ठेवले आहे ही कौतुकास्पद गोष्ट आहे. यासाठी मेरीटाईम बोर्ड सहकार्य करणार असल्याचे सुतोवाच सिंधुदुर्गचे प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप भुजबळ यांनी विजयदुर्ग येथे केले. विजयदुर्ग किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या वतीने काल मराठी नवीन वर्षाचे औचित्य साधून पर्यटक विसावा केंद्राचे उद्धाटन संदीप भुजबळ यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. हे पर्यटक विसावा केंद्र प्रेरणोत्सव समितीच्या वतीने किल्ल्याच्या पायथ्याशी चालू करण्यात आले आहे. यावेळी विजयदुर्ग मेरीटाईम बोर्डाचे बंदर अधिकारी रजनीकांत पाटील, विजयदुर्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक भारत फारणे, देवगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गांवकर, विजयदुर्ग ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच रियाज काझी, विजयदुर्ग किल्ले प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद देवधर, सचिव बाळा कदम आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
दरम्यान, देवगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गांवकर यांनी अष्टशताब्दी किल्ले महोत्सवाच्या आठवणीना उजाळा देताना प्रेरणोत्सव समितीच्या माध्यमातून पर्यटन विकास विकास होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. गांवकर पूढे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा हा नैसर्गिकरित्या पर्यटनाला अनुकूल आहे. मात्र सुविधा उपलब्ध केल्या तर गोव्यात जाणारा पर्यटक इथेच थांबेल. यावेळी विजयदुर्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक भारत फारणे यांनीही विजयदुर्गचा ऐतिहासिक बाबतीत उहापोह करताना येथील पर्यटन स्थळाचा आवर्जून उल्लेख केला. अशा ठिकाणी काम करण्याचे भाग्य आपल्याला लाभले असून प्रेरणोत्सव समितीला सामाजिक जाणीव ठेवून आपण सहकार्य करू. दरम्यान, विजयदुर्ग गावातील पर्यटनाला सातत्याने चालना देणारे रजनीकांत पाटील यांनी पर्यटनवृद्धीसाठी अहोरात्र तत्पर असल्याचे सांगितले. विजयदुर्ग किल्ले आणि येथील पर्यटन हा महत्वाचा भाग असल्याने गुढीपाडवा असतानाही मोठ्या संख्येने ग्रामस्थ, किल्लेप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद देवधर यांनी केले. सुत्रसंचालन रविकांत राणे यांनी तर आभार प्रवीण तरवडकर यांनी मानले. दरम्यान, प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परूळेकर यांनी भविष्यातील विजयदुर्ग किल्ले संवर्धनासंदर्भात भाष्य करताना मार्च महिन्यापासून पे अॅन्ड पार्किंग व्यवस्था चालू होणार असल्याचे सांगितले.