‘कवितेचा चैत्र पाडवा’ कार्यक्रमात कवयित्री अंजली ढमाळ यांचे प्रतिपादन
सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) : वैचारिक बैठक पक्की असेल तरच चांगली कविता लिहिणे शक्य असते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवयित्री तथा राज्य कर विभागाच्या डेप्युटी कमिशनर अंजली ढमाळ यांनी सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘कवितेचा चैत्र पाडवा’ या कार्यक्रमात केले.
सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे कवयित्री ढमाळ यांच्या अध्यक्षतेखाली ‘कवितेचा चैत्र पाडवा’ हे ऑनलाईन कविसंमेलन आयोजित करण्यात आले. समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि कार्यवाह वैभव साटम यांनी संयोजन केलेल्या या कार्यक्रमात कवयित्री ढमाळ यांनी आपली कविता अधिकाधिक व्यापक अन् सखोल व्हावी यासाठी नव्या कवींनी प्रयत्नशील रहायला हवे असेही आग्रहाने सांगितले.
विनिता पांजरी यांनी आपल्या कवितेत शब्द, अक्षरं यांच्या धांदलीत गोंधळलेल्या प्रश्नचिन्हाचे रुपक छान मांडले.सुरेश बिले यांनी ‘मर्म’ या गेय कवितेतून आनंदी राहात कृतार्थ आयुष्य जगण्याचे मर्म सांगितले.मनिषा शिरटावले यांनी ‘कातळ… पाझर’ या कवितेतून मानवी नातेसंबंधातील सुसंवादासाठीची तहान अन् वास्तवातील चटके यांचे नेमकेपणाने वर्णन केले. योगिता राजकर यांनी ‘ती’ या कवितेतून सगळ्या नकारात्मकतेला झटकून टाकणारा प्रत्ययकारी आशावाद सुंदररित्या मांडला.तर प्रा. प्रियदर्शनी पारकर यांनी ‘माणसे आणि मुखवटे’ या कवितेतून विदारक वास्तवाचे भेदक चित्रण सादर मुखर केले.नीलम यादव यांनी ‘कविता सरखी होऊन येण्यासाठी’ या कवितेतून प्रत्यक्ष कवितेशीच अतिशय सुंदररित्या भावोत्कट संवाद साधला.रमेश सत्यवती नागेश यांनी ‘त्यांच्या खडतर वाटेवर’ या कवितेतून खडतर आयुष्याचा सामना करणाऱ्या समस्त माय-माऊलींच्या सहवेदनेचे भाव छान व्यक्त केले.गौरव म्हाडगुत यांनी ‘दोर की दोरखंड’ या कवितेतून रुढी परंपरांच ओझं व्यक्त केले.मनीषा पाटील यांनी ‘मुले’ या कवितेतून विस्कटलेले बालपण मांडले.वैभव साटम यांनी ‘कवितेचे काही तुकडे’ सादर करत सर्वांना काव्यनिर्मितीशी अन त्यादरम्यान होणाऱ्या कवीच्या तगमगीशी जोडून घेतले. तर मधुकर मातोंडकर यांनी ‘तुम्ही अनभिज्ञ असता’ या कवितेतून रक्ताची नाती, नात्यांचे विविध पदर, विरविरीत झालेल्या नात्यांचा विदीर्ण करणारा लेखाजोखा खूप गहिरेपणानं मांडला.