एक्साईज इन्सुली चेक पोस्ट पथकाची कामगिरी
सावंतवाडी (प्रतिनिधी) : राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग पथकाने गोवा मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर, समर्थ हॉटेल जवळ, सटमटवाडी, बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतुक करतांना चारचाकी वाहनासह अंदाजे. 10,24,400/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. मनोज शेवरे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली पथकाने मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार शेर्लेहून खामदेव नाक्याकडे येणाऱ्या संशयित वाहनाची तपासणी करत असताना चारचाकी वाहन क्र. MH-09-FB-5129 वाहनास तपासणी कामी थांबण्याचा इशारा केला असता सदरचे वाहन न थांबता राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वरून गोव्याच्या दिशेने गेल्याने सदर वाहनाच्या पाठीमागे खाजगी वाहनाने गेलो असता सदरचे वाहन हे वर नमूद ठिकाणी उभे असलेले आढळून आले. सदर वाहनाची तपासणी केली असता सदर चारचाकी वाहनाच्या पाठीमागील सीटवर गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या विविध बॅन्डचे 31 बॉक्स (412 बाटल्या) अवैध मद्यसाठा मिळून आला सदर प्रकरणी वाहन चालक-प्रेम शामलाल पंजवाणी, वय 28 वर्षे व राहुल अशोक पाटील, वय 34 वर्षे, दोघे रा. कोल्हापूर यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.
सदर गुन्ह्यामध्ये अं.रु.2,24,400/- किंमतीचे मद्य व रु.8,00,000/- किंमतीचे चारचाकी वाहन असा एकुण अं.रु.10,24,400/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. सदर कारवाई प्रदीप रास्कर, प्रभारी निरीक्षक, विवेक कदम, दुय्यम निरीक्षक, रणजीत शिंदे, जवान नि. वाहन चालक, सतिश चौगुले, जवान, सागर सुर्यवंशी, जवान, अभिषेक खत्री, जवान यांनी केली. सदर प्रकरणी पुढील तपास प्रदीप रास्कर, प्रभारी निरीक्षक तपासणी नाका इन्सुली हे करीत आहेत.