विमानतळाला आधी विरोधाची भाषा करणारे आणि मग पेढे वाटणारे राऊत-नाईक सिंधुदुर्गला नवे नाहीत! त्यांचे मगरीचे अश्रू फक्त राणेविरोधासाठी, विकासासाठी नव्हे!!
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कुलूप आणि उबाठा याचे नाते अलीकडे घट्ट व्हायला लागले आहे. उद्धव ठाकरे उबाठाचे मुख्यमंत्री बनले तेव्हाही राज्याला टाळेच ठोकले गेले होते. मागील दहा वर्षात कुडाळ मालवणच्या विकासाला लागलेले टाळे जनतेनेच खोलून इथल्या विकासाचा मार्ग आमदार निलेश राणे यांच्या रूपाने मोकळा केला आहे. जनतेला विकास हवा आहे, वैभव नाईकांची कुलूपाची दळभद्री भाषा नव्हे असे परखड प्रतिपादन शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी यांनी केले आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने खोक्याचे राजकारण करणाऱ्या उबाठासेनेला खोक्यात बंद करत हे खोके मातोश्रीच्या भंगारखान्यात फेकले आहेत. त्यातच सिंधुदुर्गातले खोके जमा झाले आहेत. त्यांचे राजकारणच फक्त राणे या नावावर चालत असल्याने नाहक टीका करून वातावरण खराब करायचे आणि प्रसिद्धीत रहायचे हा सवंग फंडा आहे.
उबाठाच्या कोणालाही विमानतळावर भाष्य करण्याचा नैतिक अधिकारच नाही. कोणाच्या खोक्यावर त्यांनी चिपी विमानतळाला विरोध केला आणि काम रखडवले हे अख्खा कोकण जाणतो. वेळीच जर नारायण राणे यांना साथ दिली असती तर आज हा विमानतळ आंतरराष्ट्रीय झाला असता. वैभव नाईक यांचे आताचे विमानतळासाठीचे अश्रू हे मगरीचे आहेत.
चिपी विमानतळ पुन्हा एकदा उर्जितावस्थेत आणण्यासाठी नारायण राणे समर्थ आहेत. रिकामटेकड्या वैभव नाईकांनी चिपीच्या माळरानावर उंडारण्याचे रिकामधंदे आता थांबवावेत. ही वेळ सिंधुदुर्ग जिल्ह्याला नावलौकिक मिळवून देण्याची आहे, जिल्ह्याला नाहक बदनाम करण्याची नव्हे याचे भान त्यांनी जिल्हावासिय म्हणून तरी राखावे. विमानसेवा पूर्ववत सुरु नक्कीच होईल आणि जिल्ह्याची आर्थिक स्थिती सुधारेल, उद्योगधंदे विस्तारतील तसे विमानाचे भारमानही वाढेल. आमदार निलेश राणे यांची वाटचाल त्या दिशेने चालली आहे.
लवकरच ही हवाई वाहतूक विस्तारेल तेव्हा मागच्या वेळेप्रमाणे माजी खासदार विनायक राऊत आणि माजी आमदार वैभव नाईक हे बॉक्स घेऊन पेढे वाटायला निश्चितपणे पुढे असतील हा विश्वास आहे, अशी कोपरखळी रत्नाकर जोशी यांनी वैभव नाईक यांना दिली आहे.