मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई येथे गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ क्लब जवळ उभारण्यात येणाऱ्या नवीन जेटीचे काम दर्जेदार आणि सर्व सोयींनी युक्त करावे अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिल्या मंत्री नितेश राणे यांनी रेडिओ क्लब येथे उभारण्यात येणाऱ्या जेटीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अभियंता पी. प्रदीप, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढिये, मुख्य अभियंता राजाराम पुरी गोसावी, मुख्य बंदर अधिकारी कॅप्टन खरा, मुख्य सागरी अभियंता प्रकाश चव्हाण, अधीक्षक अभियंता श्रीकांत बांगर आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
रेडिओ क्लब येथील जेटी ही प्रवाशांसोबतच पर्यटनासाठी उपयुक्त असणार असल्याचे सांगून मंत्री नितेश राणे म्हणाले की, या जेटीचे काम लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. लागणाऱ्या सर्व विभागांच्या परवानग्या लवकरात लवकर मिळवाव्यात. येथे निर्माण होणाऱ्या सोयी सुविधा दर्जेदार असाव्यात. या नवीन जेटीमुळे सध्याच्या जेटीवरील ताण कमी होणार आहे. याचा विचार करून याचे काम करावे अशा सूचनाही मंत्री श्री राणे यांनी दिल्या.
यावेळी मंत्री नितेश राणे यांनी गेट वे ऑफ इंडिया ते रेडिओ क्लब परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली आणि कामाची सविस्तर माहिती आणि सध्य स्थिती जाणून घेतली.
रेडिओ क्लब येथे प्रवासी आणि पर्यटन यासाठी टर्मिनल इमारतीसह इतर सुविधा उभारण्यात येत आहेत. त्यामध्ये ८० मीटर बाय ८० मीटरचा टर्मिनल प्लॅटफॉर्म, टर्मिनल इमारत, २१४ मीटर लांब आणि १२ मीटर रुंद जेटी, ३५० लोकांची क्षमता असलेले अँफिथियेटर, प्रतीक्षालय, प्रसाधनगृह, पाणपोई, अग्नी सुरक्षा प्रणाली, सीसीटिव्ही यंत्रणा यांचा समावेश आहे.


