धामापूर ग्रामपंचायतमध्ये आधारकार्ड नूतनीकरण शिबीराचा शुभारंभ
चौके (प्रतिनिधी) : आपल्या धामापूर गावची ख्याती जगभर पसरलेली आहे. हा नावलौकिक कायम राखण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊन कार्य करणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. आपल्या गावच्या विद्यमान सरपंच मानसी परब आणि त्यांचे सहकारी सदस्य यांचा पहिल्या दिवसापासून कामाचा धडाका आणि सातत्याने सामाजिक उपक्रम राबविण्याचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. धामापूर गावावर माझे विशेष प्रेम असून सरपंच आणि ग्रामपंचायतीला माझे सर्वतोपरी सहकार्य राहील, असे आश्वासन धामापूर गावचे सुपुत्र तथा माजी आमदार सुभाष चव्हाण यांनी धामापूर ग्रामपंचायत येथे बोलताना दिले.
ग्रामपंचायत धामापूर यांच्या वतीने मंगळवार २८ मार्च व २९ मार्च असे दोन दिवसाचे माफक दरात आधारकार्ड नूतनीकरण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार सुभाष चव्हाण यांच्या हस्ते आज सकाळी दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी सरपंच मानसी परब, उपसरपंच रमेश निवतकर, माजी सरपंच ज्ञानेश्वर परब, प्रा. महेश धामापूरकर, उद्योजक महेश परब, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गावडे, स्वप्निल नाईक, तेजस्विनी भोसले, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने माजी आमदार सुभाष चव्हाण यांच्या शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देउन सत्कार करण्यात आला. सदर आधारकार्ड शिबीरात नवीन आधारकार्ड नोंदणी, नावात दुरुस्ती, मोबाईल क्रमांक अपडेट, पत्ता बदलणे, इत्यादी सेवा माफक दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आपल्याच गावात सलग २ दिवस उपलब्ध करून देण्यात आलेल्या या सुविधेचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच मानसी परब यांनी शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी केले.