एसपी सौरभ अग्रवाल यांची आणखी एक दमदार कामगिरी

चोपडा पोलीस ठाण्यात तपास केलेल्या गुन्ह्यातील आरोपीला आजन्म कारावास

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी आणखी एक दमदार कामगिरी केली असून जळगाव जिल्ह्यातील चोपडा पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्याचा तत्कालीन डीवायएसपी पदी कार्यरत असलेल्या सौरभ अग्रवाल यांनी केलेल्या यशस्वी तपासानुसार पोक्सोसह जीवघेणा हल्ला करून बलात्काराच्या खटल्यातील आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. देवेंद्र राजेंद्र भोई (रा. वैजापूर चोपडा) असे आजन्म कारावास झालेल्या आरोपीचे नाव आहे. या केसचा निकाल मंगळावर 28 मार्च रोजी लागला. आयपीएस ऑफिसर असलेल्या सौरभ अग्रवाल यांनी सिंधुदुर्गात एसपी पदाचा कार्यभार सांभाळण्याआधी जळगाव जिल्ह्यात डीवायएसपी पदी सेवा बजावली आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा पोलीस ठाण्यात 2019 साली सी. आर. नं. 68 नुसार अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर जीवघेणा हल्ला करत बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात पीडित अल्पवयीन युवतीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीनुसार आरोपी देवेंद्र भोई याच्या विरोधात आयपीसी 307, 376 ( A ), ( B ) , 363, 341, 323 तसेच पोक्सो नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.या गुन्ह्याचा महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना करपुडे यांनी सुरुवातीला तपास केला होता. त्यानंतर तत्कालीन डीवायएसपी सौरभ अग्रवाल यांनी या गुन्ह्याचा अधिक सखोलपणे तपास करून आरोपीविरोधात गुन्हा शाबीत करतील असे वस्तुस्थितीदर्शक पुरावे गोळा करत न्यायालयात सरकारी वकिलांमार्फत सादर केले होते. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता के. एल बागुल यांनी यशस्वी युक्तिवाद केला. सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर अमळनेर न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी आर चौधरी यांनी आरोपी देवेंद्र भोई याला मरेपर्यंत आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.या केसकामी पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस फौजदार उदयसिंग साळुंखे यांनी काम पाहिले. गुन्हेगाराला शिक्षा होईपर्यंत यशस्वी तपास केल्याबद्दल एसपी अग्रवाल यांच्या या दमदार कामगिरीचे सिंधुदुर्ग तसेच जळगाव पोलीस दलात अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!