तळीराम ट्रेलर चालकाला ताब्यात घेत केली कारवाई
ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरणी न्यायालयाने ठोठावला 4 हजार दंड
कणकवली (प्रतिनिधी) : मंगळवार 28 मार्च रोजीची वेळ दुपारी बाराची… डोक्यावर आग ओकत असणारा सूर्य…इतक्यात मध्यधुंद अवस्थेत ट्रेलरचालक भरधाव ट्रेलर चालवत असल्याची एका जागृत वाहनचालकाने कणकवलीत ट्राफिक पोलिसांना माहिती दिली आणि क्षणार्धात वाहतूक पोलिसांनी धगधगत्या उन्हात पाठलाग करून त्या तळीराम ट्रेलरचालकाला गडनदिपुलावर गाठून ताब्यात घेतले. वाहतूक पोलिसांनी दाखवलेल्या या कार्यतत्परतेमुळे संभाव्य मोठा अपघात टळला. कणकवली शहरात आज सुरू असलेल्या शिवसेना आंदोलन वेळी जिल्हा वाहतूक शाखेसह कणकवली पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत ठेवण्याचे कर्तव्य बजावत होते.त्याच वेळी गुजरात सुरत येथून गोवा येथे निघालेल्या मालवाहू ट्रेलर MH40-CD-2025 वरील चालक मद्यधुंद होऊन गोव्याकडे जात असताना एका जागृत वाहन चालकाने कणकवलीत आंदोलनस्थळी ऑन ड्युटी वाहतूक पोलिसांना सांगताच जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार प्रकाश गवस, वाहतूक पोलीस सुनील निकम,संदेश आबिटकर, कणकवली पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस नाईक विनोद चव्हाण यांनी तात्काळ ट्रेलर चा पाठलाग करत गडनदीपुलावर मद्यधुंद अवस्थेत ट्रेलर चालकाला ताब्यात घेतले. त्या मद्यधुंध चालकास कणकवली न्यायालयात कणकवली नेऊन त्याचेवर केलेल्या कारवाईत न्यायालयाने त्यास 4000 रुपये दंडात्मक शिक्षा ठोठावून यापुढे असे कृत्य न करणेची समज दिली.वाहतूक पोलिसांच्या या कर्तव्यदक्षतेबाबत सर्व स्तरातून कौतुक होत आहे.