कणकवली (प्रतिनिधी) : नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फौंडेशन (रजि..) व इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी बेळगावी यांच्या वतीने दिला जाणार सामाजिक सेवेचा राष्ट्रीय पुरस्कार यावर्षी साद फाउंडेशनच्या अध्यक्षा गितांजली नाईक यांना गणपत पार्सेकर महाविद्यालय हरमल – गोवा येथील भव्य कार्यक्रमात माजी केंद्रीय रत्नमाला सावनूर यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. यावेळी कोल्हापूरचे मा.महापौर राजू शिंगाडे, आयपीएस अरविंद घट्टी, उद्योगपती सुरेशदादा पाटील, साद चे कार्यवाह व युनिक अकॅडेमी सिंधुदुर्गचे संचालक सचिन कोर्लेकर असे अन्य मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या या संस्थानी सिंधुदुर्गातून प्रशासकीय आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात सुरुवातीपासूनच उल्लेखनीय काम करणारी व्यक्ती म्हणून कुडाळ नगरपंचायत च्या प्रशासकीय अधिकारी आणि साद फाउंडेशन सिंधुदुर्ग च्या अध्यक्षा गितांजली नाईक यांची विशेष करून निवड केली असल्याचे सदर संस्थेच्या वतीने जाहीर सांगण्यात आले. अशा प्रकारे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये कोल्हापूर,कर्नाटक,बेळगाव , कोकण विभाग येथील व्यक्तींचा समावेश होता. संस्थेच्या नियोजनाप्रमाणे आयोजित मोठया दिमाखदार सोहळ्यात साद च्या अध्यक्षा व कुडाळ न.प.च्या प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक यांना ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत सन्मानपुर्वक समाजसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय स्तरावरचा हा पहिलाच पुरस्कार साद फाउंडेशन च्या अध्यक्षा गितांजली नाईक यांना मिळाला असून विशेष प्रमाणपत्र,सन्मान चिन्ह,म्हैसूर फेटा, चंदनाचा कायमस्वरूपी हार,भारत सरकारचे मा.केंद्रीय मंत्री यांचेकडून अभिनंदन पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. श्रीमती नाईक यांनी आनंद व्यक्त करून हा पुरस्कार वडील दिवंगत माजी ग्रामसेवक एल एम नाईक यांना समर्पित करत हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या होतकरू , कष्टकरी, गरजू, वंचित,अन्यायग्रस्त,दुर्लक्षित विद्यार्थी, स्त्री ,पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि माझ्या कुटुंबियांचा सन्मान असल्याचे सांगितले. समाजसेवेचा हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल गितांजली नाईक यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.