एम. के. गावडे यांच्यासह महाविकास आघाडीला धक्का
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील महाविकास आघाडीला सहकार क्षेत्रात फार मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे एम. के. गावडे अध्यक्ष असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाचे संचालक मंडळ सरकारने मुदत संपल्याने बरखास्त केले आहे. या संचालक मंडळात राष्ट्रवादी काँग्रेससह राष्ट्रीय काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे संचालक होते.
अनियमित कामकाजामुळे संचालक मंडळ बरखास्त करण्याची वेळ येणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिली दुग्ध संस्था आहे. या दूध संघात असलेली अनियमितता, पंचवार्षिक निवडणुका न घेणे, मतदारांची यादी तयार करून ती सरकारकडे सादर न करणे अशा अनेक त्रुटी या संचालकांच्या कामकाजात आढळून आल्या. त्यामुळे अध्यक्षांसह संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७७ अ अन्वये सहकारी संस्था (दुग्ध) मुंबई विभागीय उपनिबंधक दिपक खांडेकर यांनी ही कारवाई केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघ मर्या. कुडाळ, जि. सिंधुदुर्गला तसे आदेश दिले आहेत. या संघावर प्राधिकृत समिती नियुक्ती करण्यात आली असून यात सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) हे अध्यक्ष राहणार आहेत. प्राधिकृत समितीने तात्काळ संघाचे व्यवस्थापन हाती घेऊन सहा महिन्याचे आत नवीन समिती कायदेशिररित्या निवडून येण्यासाठी कार्यवाही करावी व कामकाजाचा अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत.












