सिंधुदुर्गात माती विक्रीच्या नावाखाली हायग्रेड खनिजाची लूट

महसूल विभागाचा ढिसाळ कारभार

सिंधुदुर्ग मधील अन्य तालुक्यात देखील कारवाई करणार का डोळेजाकपणा करणार..?

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात माती विक्रीच्या नावाखाली हायग्रेड खनिजाची मोठ्या प्रमाणावर लूट सुरू असून शासनाच्या महसूलाला गंडा घालण्याचा प्रकार बिनधास्तपणे सुरू आहे. महसूल विभागाच्या निष्काळजीपणामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी महसूल विभागाने वेंगुर्ला तालुक्यातील खाणींवर टाकाऊ माती विक्री परवान्यानवर तातडीने बंदी घातली आहे. यापुढे सखोल चौकशी केल्यानंतरच परवाने देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, जिल्ह्यात इतर तालुक्यांतही अशाच प्रकारे अवैध खनिज उत्खनन व वाहतूक सुरू असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.

कणकवली, मालवण आणि देवगड तालुक्यातही खनिज लूट सुरू
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, मालवण आणि देवगड तालुक्यात देखील जांभा दगड ( चिरे )नावाखाली हायग्रेड खनिजाची देखील लूट सुरू आहे. विशेषतः इको सेन्सेटिव्ह झोन असलेल्या गावांमध्ये बेकायदा खाणी कार्यरत असल्याचे दिसुन येते पर्यावरणास हानी पोहोचवणाऱ्या या कारवायांकडे महसूल, वन विभाग, पोलीस आणि आरटीओ अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत

ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था
या अवैध खनिज वाहतुकीसाठी ओव्हरलोड ट्रक आणि डंपरचा सर्रास वापर केला जात आहे. परिणामी रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून आधीच निकृष्ट दर्जाचे रस्ते अधिकच खराब झाले आहेत. वारंवार खड्डे आणि चिरडलेल्या रस्त्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

पालकमंत्री नितेश राणे लक्ष घालणार का?
“सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन नंबर धंद्यांना थारा नाही” असा स्पष्ट इशारा देणारे पालकमंत्री नितेश राणे यांच्यासमोरअसणारे मोठे आव्हान स्वीकारून बेकायदा उत्खनन आणि खनिज वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालकमंत्री श्री नितेश राणे तातडीने पावले उचलतील का? सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या या अवैध खनिज लुटीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) लवकरच उग्र आंदोलन छेडणार आहे. मनसेच्या वतीने या संदर्भात अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला जाणार असून, जर खनिज लूट थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही, तर मोठ्या प्रमाणावर रास्ता रोको, मोर्चा आणि उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.या काळ्या धंद्या विरोधात जिल्ह्यात व्यापक तपासाची मागणी करणार असुन या अवैध खनिज उत्खनन आणि महसूल बुडवणाऱ्या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी देखील मनसे करणार आहे. महसूल, पोलीस आणि वन विभागाच्या अधिकार्‍यांची या लुटीत सहभागाची शक्यता असल्याने संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. असे आवाहन मनसे माजी जिल्हा उपाध्यक्ष दया मेस्त्री यांनी केले

error: Content is protected !!