आचरा (प्रतिनिधी) : कोकणातील प्रथितयश साहित्यिक तथा उपक्रमशील विषय शिक्षक बाबू घाडीगांवकर यांना मुंबई येथील ‘कोकणदीप’ या संस्थेच्या ‘कोकणदीप शिक्षणरत्न’ पुरस्कारने सन्मानीत करण्यात आले. दादर, मुंबई येथील मराठी ग्रंथसंग्रहालय संस्थेच्या सुरेंद्र गावसकर सभागृहात आयोजित केलेल्या समारंभात महाराष्ट्राचे राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या हस्ते त्यांना हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्यासह दै. प्रहारचे संपादक सुकृत खांडेकर, कोकणदीपचे संपादक दिलीप शेडगे, डाॅ. राम मेस्री, सुधीर कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
बाबू घाडीगांवकर हे गेल्या तीस वर्षांपासून साहित्य व शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. कोकणातील विविध दैनिक वृत्तपत्रे व नियतकालिकांतून त्यांचे विविध विषयांवरील सदरलेखन सुरु आहे. त्यांचा ‘बाबा’ हा कवितासंग्रह, वणवा हा लघुकथासंग्रह प्रसिद्ध झाला. असून तब्बल तीन हजारांहून अधिक लेख, कथा, कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. साहित्य क्षेत्रातील विविध संस्थांचे अनेक राज्यस्तरीय पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. याशिवाय शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कर्तृत्व लक्षात घेऊन शिक्षण क्षेत्रातील विविध पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले आहेत. कोकणदीप या मासिकाने चोविसाव्या वर्षात पदार्पण केल्याने नुकताच कोकणदीप मासिकाच्या तेवीसाव्या वर्धापनदिनानिमित्त मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिंचा राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. बाबू घाडीगांवकर यांना ‘कोकणदीप शिक्षणरत्न ‘ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.












