हायवेबाबत माहिती घेऊन त्वरित कार्यवाही करू; जिल्हाधिकाऱ्यांचे खारेपाटण शिष्टमंडळाला आश्वासन

​खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नडगिवे येथील धोकादायक वळणामुळे होणारे अपघात आणि खारेपाटण परिसरातील महामार्गाची प्रलंबित असलेली कामे या गंभीर प्रश्नांबाबत खारेपाटण येथील शिष्टमंडळाने नुकतीच सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेतली. या प्रश्नांची दाहकता जाणून घेतल्यानंतर, नॅशनल हायवे अथॉरिटीशी (NHAI) चर्चा करून आपण तात्काळ तोडगा काढण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले.

यावेळी पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे, खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव, खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत,शिवसेना कणकवली तालुका प्रमुख मंगेश गुरव,खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर या शिष्टमंडळाने नुकतीच जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नडगिवे येथे सातत्याने होणाऱ्या अपघाता बाबत लेखी निवेदन दिले.

नडगिवे येथील राष्ट्रीय महामार्गावर असलेले धोकादायक वळण हे सध्या अपघाताचे प्रमुख केंद्र बनले असून, येथे वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे प्रवासी व नागरिकांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.तसेच खारेपाटण शहरातील महामार्गाची अनेक कामे बऱ्याच काळापासून प्रलंबित असल्याने स्थानिक नागरिकांना या अपूर्ण कामाचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या सर्व बाबींची वस्तुस्थिती शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.

या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने मांडलेल्या मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सांगितले की, “महामार्गावरील हे प्रश्न प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून.नॅशनल हायवे अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधिताना दिल्या जातील असे सांगितले.​जिल्हाधिकाऱ्यांच्या या आश्वासनामुळे नडगिवे येथील धोकादायक वळणाचा प्रश्न सुटण्याच्या आणि खारेपाटणमधील रखडलेली कामे मार्गी लागण्याच्या आशा यानिमित्ताने पल्लवीत झाल्या आहेत.

तर जिल्हाधिकारी यांच्या भेटी नंतर मुंबई – गोवा राष्ट्रीय महा मार्गावरील नडगीवे येथील धोकदायक अपघात स्पॉट ची नुकतीच महामार्ग प्राधिकरणाने दखल घेतली असून लगेच कार्यवाहीला सुरुवात झाली असून अपघातग्रस्त धोकादायक वळणावरील साईडपट्टीची उंची माती भराव टाकून त्वरित वाढविण्यात आली आहे.तर महामार्गावर धोकादायक ठिकाणी ड्रम आडवे ठेवून वाहनाची गती रोखण्याचे काम करण्यात आले आहे.

error: Content is protected !!