मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नडगिवे अपघात स्पॉट ची कार्य अभियंता वृषाली पाटील यांजकडून पाहणी

“महार्गावरील डेंजर झोन ठिकाणी तातडीने उपाय योजना करावी”

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारेपाटण पासून जवळ असलेल्या नडगिवे येथे डेंजर झोन ठरलेल्या अपघात प्रवण क्षेत्राला आज सोमवारी स. ११.३० वाजता महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खारेपाटण उप विभागीय कार्यालयाच्या कार्यकारी अभियंता वृषाली पाटील यांनी तातडीने भेट देऊन या महामार्गाची पाहणी केली. यावेळी खारेपाटण जि. प. सदस्य प्राची ईसवलकर उपस्थित होत्या. नडगिवे येथील गावातून जाणाऱ्या या मुंबई – गोवा राष्ट्रीय महार्गावर गेल्या आठवडाभरात सुमारे ६ पेक्षा अधिक वाहनाचे अपघात झाले आहेत. तर यामध्ये अनेक प्रवासी नागरिक जखमी झाले असून काही जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू देखील झालेला आहे. याबाबत वारंवार वृत्तपत्रातून आवाज उठवून देखील त्याकडे संबंधित अधिकाऱ्याचे दुर्लक्ष झाले होते. मात्र आज खारेपाटण जि. प.सदस्य प्राची ईसवलकर यांनी आक्रमक भूमिका घेत याचा प्रशासनाला जाब विचारल्यानंतर व नागरिकांना घेऊन आंदोलन करणार असल्याची भूमिका घेतल्यावर सार्व बांधकाम विभागाच्या साहाय्यक कार्यकारी अभियंता वृषाली पाटील यांसह महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी उपस्थित राहून येथील महामार्गाची पाहणी केली. यावेळी नडगिवे गावच्या सरपंच माधवी मण्यार, उपसरपंच भूषण कांबळे, माजी सरपंच अमित मांजरेकर, माजी उपसरपंच भावेश कर्ले, अरुण कर्ले, राजेश वारंगे, राजन भोकरे, नडगिवे पोलिस पाटील जितेंद्र मण्यार, छोटू सुतार, सत्यवान तळेकर, खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य किरण कर्ले बूथ अध्यक्ष शेखर कांबळी आदी मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

जि. प. सदस्य प्राची ईसवलकर यांनी संबधीत अधिकाऱ्यांना महामार्गावर नडगिवे येथे असलेले धोकादायक अवघड वळणे अपघातग्रस्त ठिकाणे दाखवली. व नडगिवे बांबर वाडी ते गणेश कर्ले घर सिद्धिविनायक हॉटेल पर्यंत महामार्गावर अपघात होणार अशा तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या. तर नडगिवे एस. टी. बस स्टॉप ते रामेश्वर नगर खारेपाटण पर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूला नागरी वस्ती असल्याने रस्ता वाहनांना रस्ता ओलांडण्यासाठी सुमारे तीन किलोमीटर वळसा मारावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे तर या दरम्यान नडगिवे इंग्लिश मिडीयम स्कूल फाट्याजवळ रस्ता क्रॉस करण्यासाठी डिव्हाईडर मोकळे करून नवीन मार्गिका बनवावी अशी मागणी यावेळी जि. प. सदस्य प्राची ईसवलकर यांनी केली. नडगिवे येथील संपूर्ण महामार्गाची पाहणी केल्यानंतर कार्यकारी अभियंता वृषाली पाटील यांनी अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी रंमब्लर बसविण्यात येतील तसेच अत्यावश्यक ठिकाणच्या महामार्गावर अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या धोकदायक वळणे दरड कटिंग करून रस्ता सुरक्षित केला जाईल असे सांगितले. तर रस्त्याच्या धोकादायक वळणे काढून रस्ता साइड पट्टी रुंदीकरण करून वाढवल्या जातील असे देखील सांगितले व रस्त्याची संपूर्ण कामे येत्या पावसाळ्यापूर्वी पुर्ण केली जातील असे सांगितले. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नडगिवे येथील ही कामे तातडीने पूर्ण न केल्यास नागरिकांच्या वतीने महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी जि. प. सदस्य सौ प्राची ईसवलकर यांनी प्रशासनाला दिला.

error: Content is protected !!