सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : स्वतःच्या जन्मदातीचा खून केल्याप्रकरणी सावंतवाडी तालुक्यातील विलवडे वरचीवाडी येथील दीपक विष्णू दळवी (वय ४७) यांना जिल्हा न्यायालयाने जन्मठेप सुनावली आहे. तसेच दहा हजार रुपये आर्थिक दंड ठोठावला आहे.
२५ ऑगस्ट २०२२ रोजी ही दुर्दैवी घटना घडली होती. आरोपी दीपक व त्याची मयत आई राधाबाई दळवी हे दोघे घरी राहत होते. आपली आई आपले विरुद्ध गावातील लोकांना काहीतरी खोटेनाटे सांगते, असा गैरसमज करून घेऊन दीपक याने मयत आई राधाबाई हिच्या डोकीवर व छातीवर हाताचे ठोशांनी मारहाण केली. त्यातच तिचा जीव गेला. त्यानंतर बांदा पोलिस ठाण्यात येत आपली आई बेशुद्ध पडल्याचा बनाव केला. याबाबत तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक प्रवीण माने यांनी स्वतः फिर्याद दाखल केली होती.
जिल्हा व सत्र न्यायाधीश १ यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. यावेळी न्यायालयाने आरोपी दीपक दळवी यांना दोषी ठरविले आहे. खून प्रकरणी जन्मठेप ठोठावली असून दहा हजार रुपये आर्थिक दंड सुनावला आहे. या प्रकरणी सरकार पक्षाच्यावतीने सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी काम पाहिले. यासाठी न्यायालयाने एकूण सहा साक्षीदार तपासले. यामध्ये पंच बाबाजी ठाकूर, मधुरा सावंत, साक्षीदार श्रेया माळकर, अजित दळवी, वैद्यकीय अधिकारी डॉ तुषार तुळस्कर, तपासिक अधिकारी तथा पोलिस निरीक्षक शामराव काळे यांचा समावेश आहे.











