सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : गेली अनेक वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत आपल्या लेखणीतून न्याय मिळवून देणारे पत्रकार विराज विठोबा गोसावी यांना “आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
पुणे येथील सोजाई आदिवासी महिला विकास फाउंडेशनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व राज्यस्तरीय काव्य संमेलनात हा सन्मान प्रदान करण्यात आला. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत डी. चव्हाण यांच्या हस्ते मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गोसावी यांचा गौरव करण्यात आला.
विराज गोसावी यांनी दैनिक पुढारी तसेच सध्या महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनेलच्या माध्यमातून अनेक सामाजिक, स्थानिक आणि जनतेशी निगडित प्रश्न प्रभावीपणे मांडून ते मार्गी लावण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, कवी व साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












