इतिहासकार जयसिंगराव पवार यांच्या हस्ते प्रकाशन : राजकीय विश्लेषक डॉ.अशोक चौसाळकर यांची उपस्थिती
कणकवली (प्रतिनिधी) : कवी अजय कांडर यांच्या ‘युगानुयुगे तूच’ या दीर्घकवितासंग्रहावर समीक्षक प्रा. एकनाथ पाटील यांनी संपादित केलेल्या आणि लोकवाङ्मय गृह, मुंबई या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘युगानुयुगे तूच : संदर्भ आणि अन्वयार्थ ‘ या ग्रंथाचे प्रकाशन १४ एप्रिल रोजी शाहू स्मारक भवन येथे ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डाॅ. जयसिंगराव पवार यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले आहेत.या प्रसंगी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डाॅ. अशोक चौसाळकर आणि कवी अजय कांडर (कणकवली) प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
कवी कांडर यांच्या युगानुयुगे तूच या बहुचर्चित दीर्घ ग्रंथावर विविध समीक्षकांनी लेखन केले.यालेखनचा हा समिक्षा ग्रंथ असून अभ्यासपूर्ण समिक्षा लेखांबरोबच अजय कांडर यांच्या दीर्घ मुलाखतीचा समावेश आहे . सदर ग्रंथाला प्रा. पाटील यांची अभ्यासपूर्ण दीर्घ प्रस्तावना लाभली आहे. यात ते म्हणतात,आजचा काळ वेगवेगळ्या अस्मितांच्या उच्च रवाचा, अतितीव्र कलोळाचा, धर्मा – धर्मातील आणि जाती – जातींमधील टकरावांचा काळ आहे. बाबासाहेबांसारखा महापुरुष जातीच्या चौकटीत बंदिस्त करण्यात त्यांचे पारंपरिक विरोधक यशस्वी होत आहेत. तोच त्यांचा छुपा अजेंडा आहे. समाजाच्या सर्व स्तरात बाबासाहेब रुजणे, हे अशा लोकांच्या संकुचित राजकारणाला बाधक ठरणारे आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या सार्वत्रिकीकरणाचा प्रयत्न ते सतत हाणून पाडत आले आहेत. अपवाद वगळता बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून घेणारेही त्यांच्या या अशा राजकारणाला बळी पडत आहेत. बाबासाहेबांच्या विचारांऐवजी त्यांना सोयीच्या प्रतिमेत अडकवण्याचे आणि त्या माध्यमातून स्वतःचे स्वार्थ साधण्याचे राजकारण खेळले जात आहे. समाजासमाजात दुही निर्माण करून राजकीय हितसंबंध जपणाऱ्या एका व्यापक कटाचा हा भाग आहे. अशावेळी सर्वसामान्य माणसांनी सावध असले पाहिजे, याचे भान ही कविता देते’
डॉ. अशोक चौसाळकर यांची या ग्रंथाला पाठराखण लाभली असून त्यात ते म्हणतात, ‘युगानु युगे तूच’ ही कवी अजय कांडर यांची ‘दीर्घविचार कविता’ आहे. जाणकारांचे लक्ष वेधून घेणारी ही कविता चरित्राच्या अंगाने न जाता विचारसूत्रांचा शोध घेत पुढे जाते. विचारप्रवर्तक प्रस्तावनेसह या कवितेचा विविधांगी अन्वयार्थ उलगडून सांगणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या लेखांचे संपादन एकनाथ पाटील यांनी प्रस्तुत पुस्तकात केले आहे. कला, साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर वस्तुकरण होत असताना बुद्धांच्या व बाबासाहेबांच्या विचारांचा या पुस्तकातील जागर समयोचित आहे.