ज्ञानदानाचा वारसा जोपासणाऱ्या पदवीधर शिक्षिका प्रतिभा कोतवाल यांचा विशेष सन्मान
कणकवली (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने गोपुरी आश्रमात सुरू असलेल्या ‘जागर स्त्री शक्तीचा – उत्सव विचारांचा’ या कार्यक्रमात तिसऱ्या दिवशीच्या माळेत सामाजिक विषमतेचा सामना करत सावित्रीबाई-ज्योतीबा फुले यांच्यासमवेत शिक्षण प्रसारकार्य करणाऱ्या शिक्षणप्रसारक फातिमा शेख यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी गेली तीन दशके शिक्षकी पेशा स्वीकारून विज्ञाननिष्ठ, सुधारणावादी विद्यार्थी घडविणाऱ्या पदवीधर शिक्षिका प्रतिभा कोतवाल यांचा आश्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रा. राजेंद्र मुंबरकर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
प्रतिभा कोतवाल या स्वाभिमानी संवेदनशील विद्यार्थी घडविण्याच्या प्रक्रियेत पालकांचा सहभाग, समाजाची जबाबदारी, शासनाची भूमिका, धोरण या सगळ्यांचा योग्य समन्वय साधून शिक्षण प्रसाराच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या या सुधारणावादी कार्याचा गौरव करत त्यांचे कार्य अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपुरी आश्रमाच्या संचालिका अर्पिता मुंबरकर यांनी तर सूत्रसंचालन दर्शना पाताडे यांनी केले. यावेळी कवयित्री सरिता पवार, विनायक सापळे, सदाशिव राणे, उमेश कदम, कल्पना परब तसेच गोपुरीतील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.












