कोल्हापूर (प्रतिनिधी) : पोवाडा, जिजाऊ वंदना, शिवाजी महाराजांचा जन्म, शिवकार्य आणि राज्याभिषेक, ताराराणी यांची जडण-घडण, लाठी काठी – मर्दानी खेळ, ताराराणी साहेबांनी स्वतः कारभार हाती घेवून हाकलेला राज्य कारभार, छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने केलेली कैद आदी नाट्यमय व रोमांचकारी घटनांचा आज उपस्थित प्रेक्षकांनी करवीर संस्थापिका भद्रकाली ताराराणी या ऐतिहासिक नाट्याद्वारे अनुभव घेतला.

केंद्रशासनच्या सांस्कृतिक संचलनालय, राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्यावतीने शाही दसरा महोत्सव – 2025 अंतर्गत आज तिसऱ्या दिवशी दसरा चौक येथे या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. या महानाट्याने मुगल बादशहा औरंगजेबाला अखेरपर्यंत कसे झुंजविले याचे प्रभावी सादरीकरण केले. त्याला उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. विशेषत: छत्रपती संभाजीराजांना कैद करून औरंगजेबासमोर उभे करण्यात आले. यावेळी त्या दोघांच्यामध्ये झालेल्या शाब्दिक जुगलबंदीने प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.

महाराणी ताराराणी यांच्या भूमिकेत श्वेता सुतार यांनी आपल्या नैसर्गिक अभिनयाने चार चाँद लावले. यावेळी या नाटकाचे निर्माते चंद्रकांत पाटील व दिग्दर्शक ओंकार रोकडे यांचा निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या हस्ते स्मृती चिन्ह देवून गौरव करण्यात आला. तत्पूर्वी पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांनी कोल्हापूर गादीचा तसेच येथील ऐतिहासिक वास्तूंचे, वैशिष्ठ्यांचे स्लाईड शोद्वारे सादरीकरण व कथन केले.
यावेळी तहसिलदार (करमणूक) तेजस्विनी पाटील, निवासी नायब तहसीलदार नितीन धापसे पाटील, महावीर कॉलेजचे प्राचार्य अद्वैत जोशी, CPR च्या अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात, कार्य. अभियंता स्मिता माने यांच्यासह अनेक नाट्य प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.














