मालवण (प्रतिनिधी) : शहरातील बोर्डिंग ग्राऊंड येथील कोल्ड्रिंक हाऊसमध्ये मोबाईलवर ऑनलाईन मटका जुगार घेत असताना मालवण पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत एका संशयिताला अटक करून ३१ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई काल रात्री आठच्या सुमारास पार पडली. या कारवाईत दिनकर दाजी खोबरेकर (वय ५१, रा. धुरीवाडा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोबरेकर हा मोबाईलवर जुगाराचे आकडे घेत होता आणि पैसे प्रत्यक्ष तसेच बँकेच्या स्कॅनरद्वारे स्वीकारत असतानाच पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले.
पोलिसांनी संशयिताकडून मोबाईल, प्रिंटर, रोख रक्कम, बँकेचा स्कॅनर आणि आकडेमोडीच्या पावत्या असा एकूण ३१ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धाडीत जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, उपअधीक्षक नयोमी साटम, विभागीय पोलीस अधिकारी श्री. आव्हाड आणि पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक गणेश माने, जितेंद्र पेडणेकर, सुशांत पवार, महादेव घागरे, गुरुनाथ परब, मनोज कांबळे यांनी सक्रिय सहभाग घेतला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस हवालदार जे. एस. कुडाळकर करत आहेत.












