चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील काळसे नवसाला पावणाऱ्या श्री सिद्धमहापुरुष मठामध्ये प्रतिवर्षिप्रमाणे यावर्षीही पारंपारीक प्रथेप्रमाणे सोमवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी गावकरी, मानकरी तसेच गोसावी वाडीतील रहिवासी यांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली आहे. त्यानिमित्त मठामध्ये दररोज रात्रौ स्थानिक भजन मंडळाचे सुस्वर भजन, त्यानंतर गरबा व दांडिया नृत्य असे सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. प्रथेप्रमाणे घटस्थापनेच्या तिसऱ्या दिवसा पासून गावकऱ्यांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेले देवाचे पवित्र आणि नवसाला पावणारे पतीर गावामध्ये फिरविले जात आहे.
या उत्सवाचा महत्वाचा भाग असलेला श्री देव सिद्धमहापुरुषाचा वार्षिक भंडारा उत्सव मंगळवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सकाळी ८:०० श्री सिद्धमहापुरुष पाषाणाचे विधिवत पूजन, सायं. ५:०० वाजता मुख्य आणि सार्वजनिक गाऱ्हाणे, त्यानंतर नवस बोलणे नवस फेडणे हे कार्यक्रम आयोजित केले आहेत, रात्रौ १०:०० वाजता श्री सिद्ध महापुरुष प्रासादिक भजन मंडळाचे सुस्वर भजन, १०:३० वाजता महाआरती आणि रात्रौ ११:०० वाजता देवाला नैवेद्य अर्पण करून त्यानंतर आलेल्या भाविक भक्तांना प्रसाद वाटप आणि रात्रौ उशिरा गावातील राऊळ यांचे गाऱ्हाणे होऊन या उत्सावाचा समारोप होणार आहे. अशा प्रकारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तरी सर्व भाविक भक्तांनी या भंडारा उत्सवास मोठया संख्येने उपस्थित राहून दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सिद्ध महापुरुष उत्कर्ष मंडळ गोसावीवाडी, काळसे यांच्या वतीने करण्यात आले आहे.














