अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांत कार्यकारीणी सदस्यपदी सिंधुदुर्गच्या डॉक्टर बापू भोगटे यांच्या नावाची घोषणा

चौके ( प्रतिनिधी ): कवी केशवसुत स्मारक, मालगुंड येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांत बैठकीत कोकण प्रांत कार्यकारीणीची घोषणा करण्यात आली. या कार्यकारीणीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ-पावशी गावचे सुपुत्र आणि अस्सल गावरान मातीच्या ढंगाचे साहित्यिक म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या डॉ बापू भोगटे यांची नियुक्ती घोषित करण्यात आली आहे. प्रथितयश शेतकरी असणारे डॉ. बापू भोगटे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. कोकणातील देवस्थान आणि रूढी, प्रथा परंपरा यातील त्यांचा अभ्यास दांडगा आहे. निसर्ग, त्यातील जीवसाखळी यातील त्यांचा व्यासंग वाखाणण्याजोगा आहे. रांगणा गडाच्या परिसरात बिजारोपण करून स्थानिक वृक्षांची रोपे तिथे रुजवणे आणि त्याची काळजी घेण्याचा उपक्रम मागील आठ वर्षे ते सातत्याने राबवत असून यंदाही ४ जूनला त्यांनी हा कार्यक्रम निश्चित केला आहे. कविता, लेख आदी साहित्यप्रकारातून त्यांनी कोकणी चालीरिती, निसर्ग अत्यंत उत्कृष्ट आणि ओघवत्या भाषेत रेखाटला आहे. सामान्यांमधल्या या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा गौरव अखिल भारतीय साहित्य परिषदेने केला आहे. डॉ बापू भोगटे यांचा आरोग्य, शिक्षण यासह सर्वच सामाजिक क्षेत्रात असणारा मित्रपरिवार फार मोठा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या या सुपुत्राच्या सन्मानाबद्दल जिल्ह्यात सर्वच स्तरावर आनंद व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!