विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपावी……संदिप परब, संस्थापक – अध्यक्ष जीवन आनंद संस्था

आचरा येथे जीवन आनंद संस्थेतर्फे स्वच्छता मोहीम व समाजसेवेवर मार्गदर्शन

खारेपाटण (प्रतिनिधी) : समाजातील निराधार व गरजू व्यक्तीसाठी विद्यार्थ्यांनी, शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासावी” असे प्रतिपादन जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांनी केले. जीवन आनंद संस्थेतर्फे आचरा तिठा परिसरात राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमे दरम्यान न्यू इंग्लिश स्कूल, आचरा व ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केले.

“समाजसेवा,सामाजिक जबाबदारी आणि विद्यार्थ्यांची भूमिका” या विषयावर संदिप परब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जीवन आनंद संस्थेच्या मुंबई पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह गोवा राज्यातील आश्रम, शेल्टर होम द्वारे निराधार, वंचितांचे पुनर्वसन, कुटुंब पुनर्मिलन, आणि त्यांना माणुसकीचे सन्मानजनक जीवन जगण्याची संधी मिळण्यासाठी सुरू असलेल्या सामाजिक कार्य व उपक्रमांची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली.

या उपक्रमास जीवन आनंद संस्थेचे कार्यकर्ते शैलेंद्र कदम, आशिष कांबळे, प्रकाश म्हापणकर यांच्यासह न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक अंकुशराव घुटुकडे, शाळेच्या उपमुख्याध्यापिका मधुरा माणगावकर, अनघा कदम, शीतल केरकर, सौ. व श्री. रावले, डॉ.जाधव आदी शिक्षक उपस्थित होते. तसेच आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, अजित घाडी, सचिन परब, दीपक घाडी, उमेश सावंत, संजय आचरेकर तसेच वैभवशाली रामेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष व ना. शं. कावले इंग्लिश मीडियम स्कूलचे सदस्य मंदार श्रीकांत सांबारी यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

स्वच्छता मोहीम व विद्यार्थ्यांसाठी आयोजित मार्गदर्शनपर व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर समाजसेवेची चांगली भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे उपस्थितांनी यावेळी नमूद केले.

error: Content is protected !!