‘वलयांकित चंद्र’ पुस्तकाला कोमसापचा संपादनाचा प्रथम पुरस्कार!

लेखिका उज्ज्वला धानजी यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव; २७ नोव्हेंबरला मालगुंड येथे पुरस्कार वितरण

आचरा (प्रतिनिधी) : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) २०२४-२५ या वर्षासाठीच्या पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, मालवण शाखेच्या आजीव सदस्या आणि लेखिका उज्ज्वला चंद्रशेखर धानजी यांना त्यांच्या ‘वलयांकित चंद्र’ या संपादित पुस्तकासाठी संपादनाचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. विघ्नेश प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाच्या माध्यमातून चंद्रशेखर मनोहर धानजी यांच्या विविध क्षेत्रांतील कार्यकर्तृत्वाचा घेतलेला आढावा विशेष ठरला आहे.

चंद्रशेखर धानजी हे भारतीय स्टेट बँकेच्या कलमठ शाखेत ३९ वर्षे सेवा बजावल्यानंतर चीफ असोसिएट्स या पदावरून ३० एप्रिल २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने उज्ज्वला धानजी यांनी त्यांच्या बँकिंग, सामाजिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक क्षेत्रातील योगदानावर प्रकाश टाकणारे स्नेही, सहकारी आणि आप्तेष्टांचे लेख संकलित करून ‘वलयांकित चंद्र’ हे पुस्तक संपादित केले. या पुस्तकातून त्यांच्या कार्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा विविध पैलूंनी परिचय घडतो.

या पुस्तकात मधुसूदन नानिवडेकर, सुरेश ठाकूर, प्रसाद घाणेकर, दीनानाथ धानजी, नंदकिशोर नाटेकर, एकनाथ वायंगणकर, ज्ञानेश्वर मांजरेकर, गुरुनाथ पावसकर, संतोष रानडे, प्रभाकर वळंजू, विवेक कार्लेकर, वैष्णवी धानजी, अनिल कांबळी, हरी पेडणेकर, मकरंद कुलकर्णी, राजन ठाकूर आदी मान्यवरांचे लेख समाविष्ट आहेत. पुस्तकाला माधव गावकर यांची प्रस्तावना लाभली आहे.

उज्ज्वला चंद्रशेखर धानजी या बँक ऑफ महाराष्ट्रच्या कणकवली शाखेतून मुख्य रोखपाल या पदावरून सेवानिवृत्त झाल्या आहेत. बँकिंग क्षेत्रातील जबाबदाऱ्या सांभाळतानाच त्यांनी साहित्यलेखनाची आवड जोपासली. त्या ललित लेखिका असून, त्यांचे लेख विविध मासिके आणि नियतकालिकांमधून सातत्याने प्रसिद्ध होत असतात. अलीकडेच त्यांचे ‘आठवणींच्या हिंदोळ्यावर’ हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे.

त्यांना संपादनाचा प्रथम पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कोकण मराठी साहित्य परिषद मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर गुरुजी, कोमसापचे केंद्रीय सदस्य रुजारिओ पिंटो यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

या पुरस्काराचे वितरण २७ नोव्हेंबर २०२६ रोजी रत्नागिरीतील मालगुंड या कवितेच्या राजधानीत, कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

उज्ज्वला धानजी यांच्या संपादन कौशल्याचा आणि साहित्यिक योगदानाचा गौरव करणाऱ्या या पुरस्कारामुळे मालवणच्या साहित्यिक वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.

error: Content is protected !!