स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; मोटारसायकल चोरीचे चार गुन्हे उघडकीस
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तेजस आनंद गुरखे (वय २२, रा. एमएसईबी ऑफिससमोर, यादवनगर, राजारामपुरी, कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एकूण २ लाख ८० हजार रुपये किमतीच्या पाच मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून मोटारसायकल चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना प्रतिबंध करण्याबरोबरच घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी तपास पथके तयार करून वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू केला.
दरम्यान, तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप बेंद्रे, विजय इंगळे आणि संदीप सावंत यांना गोपनीय माहिती मिळाली की, शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक ७९२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) मधील चोरीची ॲक्टिव्हा मोपेड विक्री करण्यासाठी एक संशयित इसम कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावरील फुलेवाडी येथील पाटील धाब्यासमोर येणार आहे.
या माहितीनुसार २७ नोव्हेंबर २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचला. यावेळी चोरीच्या ॲक्टिव्हा मोपेडसह तेजस गुरखे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे कौशल्यपूर्ण चौकशी केली असता त्याने आणखी तीन मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.
त्यानुसार चोरीच्या तीन मोटारसायकली आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोपेड अशा एकूण पाच मोटारसायकली कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हस्तगत करण्यात आल्या. या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि त्यांच्या पथकाने केली.












