कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील निढोरी येथे झालेल्या एका भीषण अपघातात कंटेनरखाली दुचाकी चिरडल्याने बाळूमामांचे दर्शन घेऊन परतत असलेले चंदगड तालुक्यातील दोन भाविक जागीच ठार झाले. अवजड कंटेनर चालकाचा वेगावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
तामिळनाडूतून आलेल्या एका अवजड १६ चाकी कंटेनर चालकाचा निढोरी परिसरातून येताना वेगावरील ताबा सुटला. त्यामुळे हा कंटेनर रस्त्याच्या उजव्या बाजूला उलटला. याच वेळी आदमापूरहून श्री क्षेत्र बाळूमामांचे दर्शन घेऊन दुचाकीवरून आपल्या गावाकडे (चंदगड) परतणारे दोन भाविक या कंटेनरच्या खाली चिरडले गेले.
हा अपघात इतका भीषण होता की, कंटेनरच्या वजनामुळे दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आणि दोन्ही भक्तांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. क्रेनच्या साहाय्याने अवजड कंटेनर बाजूला करण्याचे काम करण्यात आले. या हृदयद्रावक घटनेमुळे चंदगड तालुक्यासह संपूर्ण परिसरावर मोठी शोककळा पसरली आहे.












